Hrithik Roshan Sister Sunaina Roshan : हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनला दारूचं व्यसन जडलं होतं. एका मुलाखतीत सुनैनाने हा तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा असल्याचं म्हटलं आहे. दारूचे व्यसन सोडवण्यासाठी तिने तिच्या आई-वडिलांना एक चांगले व्यसनमुक्ती केंद्र शोधण्यास सांगितलं होतं. आई-वडिलांनी तिचं क्रेडिट कार्ड काढून घेतलं होतं; कारण ती दारू विकत घेण्यासाठी खूप पैसे खर्च करत होती. तसेच तिला दारू आणून देऊ शकतील अशा मित्रांना भेटण्यासही तिला मनाई करण्यात आली होती.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सुनैना म्हणाली, “दारू ही वाईट गोष्ट नाही; पण दारू ही अशी गोष्ट आहे जी पिण्यावर तुमचे नियंत्रण नसते. मी खूप कठीण काळातून जात होते. मी भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित झाले होते आणि माझ्या संवेदना सुन्न करायच्या होत्या त्यामुळे मी दारू पित होते. मला माहीत आहे की तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा होता.”
सुनैना अखेर या व्यसनातून बाहेर पडली. पण तिने ती मद्यपान करायची तेव्हाचे प्रसंग सांगितले. सुनैना काही वेळा दिवसभर दारू प्यायची. एक वेळ तर अशी आली होती की तिने आदल्या दिवशी काय केलं हेच तिला आठवायचं नाही. तसेच मद्यपानाचे शरीरावरही परिणाम दिसू लागले होते, त्यामुळे धक्का बसल्याचं सुनैनाने सांगितलं.
सर्व पैसे दारूवर खर्च करायची सुनैना
“मी बेडवरून पडले, मला दुखापत झाली, मी खुर्चीवरून घसरले होते. तो खूप कठीण टप्पा होता. हे व्यसन वाईट आहे कारण तुम्ही नशेत असता. तुमचा मेंदू सुन्न होतो. तुम्हाला दुसऱ्या दिवशी आधीपेक्षाही खूप जास्त चिंता वाटू लागते, पॅनिक अटॅक येतात. डिहायड्रेशनमुळे तुमच्यात काहीही करण्याची ऊर्जा राहत नाही आणि तुम्हाला पुन्हा चांगल्या स्थितीत जायचं नसतं, परिणामी तुम्ही पुन्हा दारू पिऊ लागता,” असं सुनैना म्हणाली. सुनैनाच्या आई-वडिलांनी तिचे क्रेडिट कार्ड काढून घेतले आणि तिला पैसे देणं बंद केलं, कारण ती सर्व पैसे दारूवर खर्च करत होती.

…अन् सुनैनाने यातून बाहेर पडायचं ठरवलं
एक वेळ अशी आली की सुनैना रोशनने या व्यसनातून बाहेर पडायचं ठरवलं. “मी माझ्या आई-वडिलांना बोलावलं, त्यांना म्हणाले सगळी अशी परिस्थिती आहे आणि मला त्यातून बाहेर यायचं आहे,” असं सुनैना म्हणाली. सुनैनाने तिचे वडील राकेश रोशन व तिची आई पिंकी रोशन यांना सांगितलं की तिच्यासाठी एक चांगलं व्यसनमुक्ती केंद्र शोधावं. नंतर सुनैनाने स्वतःच एक व्यसनमुक्ती केंद्र शोधलं आणि तिथे ती २८ दिवस राहिली.
हा निर्णय घेतल्यामुळे तिचे आई-वडील आणि तिचा भाऊ हृतिक रोशन यांना तिचा खूप अभिमान वाटतो, असं सुनैनाने नमूद केलं.