हृतिक रोशनचा १७ वर्षांचा मुलगा हृदान पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार आहे. हृदान अमेरिकेच्या प्रतिष्ठित ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया’ मध्ये चित्रपट निर्मितीचा अभ्यास करणार आहे. हृदान ज्या शाळेत शिकला त्या ‘अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे’ने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ही बातमी शेअर केली आहे. त्यानंतर हृदानवर त्याचे मित्र आणि कुटुंबीय अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
हृदान अमेरिकेत घेणार चित्रपट निर्मितीचे शिक्षण
सोमवारी रात्री ‘अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे’ने हृदानचा एक फोटो शेअर केला, त्यावर युजीसीचा लोगो आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “हृदान ‘USC’ मध्ये फिल्म आणि टीव्ही प्रोडक्शनचा अभ्यास करणार आहे! तुझे अभिनंदन हृदान, आम्हाला तुझा अभिमान आहे.” या पोस्टवर हृतिकची चुलत बहीण फिझा अली हिनेही “Yay hridu!” अशी कमेंट करून आनंद व्यक्त केला.
फिल्म इंडस्ट्रीत येणार का हृदान रोशन?
हृदान हा हृतिक रोशन आणि त्याची एक्स पत्नी सुझान खान यांचा धाकटा मुलगा आहे. त्याचे आजोबा राकेश रोशन आणि संजय खान हे दोघेही चित्रपट सृष्टीतील दिग्गज आहेत. खुद्द हृतिक सुद्धा ‘क्रिश’ फ्रँचायझीच्या आगामी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. आता हृदानने चित्रपट निर्मितीचा कोर्स निवडल्यामुळे, तो आजोबा व वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीत येणार का, अशा चर्चा रंगल्या आहेत.
हृतिक रोशन व सुझान खानचे लग्न, घटस्फोट
हृतिक आणि सुझान यांचे लग्न २००० मध्ये झाले होते आणि २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांचा मोठा मुलगा रेहानचा जन्म २००५ मध्ये, तर धाकटा मुलगा हृदानचा जन्म २००८ मध्ये झाला. घटस्फोटानंतरही हृतिक आणि सुझानचे संबंध चांगले असून ते दोघे मिळून मुलांचा सांभाळ करतात.
मिळून करतात मुलांचा सांभाळ
हृतिक रोशनबद्दल बोलायचं झाल्यास घटस्फोटानंतर तो काही वर्षे सिंगल होता. त्याचं नाव तेव्हा कंगना रणौतशी जोडलं गेलं होतं. ४ वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यात सबा आझाद आली. २०२२ च्या सुरुवातीपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी त्यांचे नातं अधिकृत केलं असून ते अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावतात. तसेच ते एकत्र फिरायला देखील जातात. दुसरीकडे, सुझान खान आणि अभिनेता अर्सलान गोनी हे २०२१ पासून एकत्र आहेत. त्यांनी आपलं नातं जाहीर स्वीकारलंय. बरेचदा हृतिक व त्याची गर्लफ्रेंड आणि सुझान व तिचा बॉयफ्रेंड एकत्र फिरायला जातात. तर हृतिक व सुझान मुलांबरोबर फॅमिली ट्रिपवरही जात असतात.
हृतिक रोशनच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास करोना नंतरचा काळ त्याच्यासाठी फारसा चांगला राहिला नाही. त्याच्या फायटरने ३०० कोटींचे कलेक्शन केले होते. तर वॉर २ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. सध्या तो क्रिश ४ या चित्रपटाच्या प्रॉडक्शनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हृतिक रोशन स्वतः करणार आहे.
