Hrithik Roshan get injured: हृतिक रोशन हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या अभिनयाबरोबरच तो त्याच्या डान्ससाठीदेखील प्रसिद्ध आहे; तसेच त्याच्या फिटनेसचीदेखील सातत्याने चर्चा होताना दिसते.
हृतिक रोशन आता मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. हृतिक रोशनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना त्याची काळजी वाटत असल्याचे दिसत आहे.
हृतिक रोशनला झाली दुखापत
इन्स्टंट बॉलीवूडने हृतिक रोशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हृतिकने काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो एका वॉकिंग स्टिकच्या मदतीने चालत असल्याचे दिसत आहे.
हृतिक जेव्हाही पापाराझींना भेटतो, तेव्हा तो त्यांना फोटोसाठी पोज देतो. मात्र, यावेळी तो पापाराझींना भेटला नाही. त्यानंतर तो गाडीत बसल्याचे दिसत आहे. आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तू लवकर बरा हो असे लिहिले आहे, तर अनेकांनी काळजी वाटत असल्याच्या कमेंट्स लिहिल्या आहेत.
नेटकरी नेमकं काय म्हणाले?
एकाने लिहिले, “सर तुम्ही लवकरच बरे व्हाल, काळजी करू नका”, दुसऱ्या एकाने लिहिले, “तो दरवर्षी का स्वत:ला दुखापत करून घेतो?”, तर आणखी एकाने लिहिले, “गेट वेल सून”, एकाने लिहिले, “मी त्याची गेल्या वर्षीची वॉकर स्टीकबरोबरची पोस्ट पाहिली होती. त्यानंतरही तो ज्या चपळतेने ॲक्शन सीन केले, त्याची मी कल्पना करू शकत नाही.”


हृतिक रोशन पहिल्यांदाच असा वॉकर स्टीकबरोबर दिसला नाही, तर गेल्या वर्षी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यावेळी त्याला कोणाच्यातरी आधाराची गरज लागत होती; त्यावेळी त्याच्या प्रतिनिधींनी सांगितले होते की हृतिकच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. तो त्यावेळी शूटिंग करत नव्हता. ‘वॉर २’मधील गाण्याचे शूटिंग करताना त्याला दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्याला आराम करण्यास सांगितले आहे.”
हृतिक रोशन सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतो. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत तो सर्वांचे लक्ष वेधून घेतो. काही दिवसांपूर्वी ‘धुरंधर’ चित्रपट पाहिल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, त्यानंतर तो मोठ्या चर्चेत आला होता. तसेच अनेकांनी त्याला ट्रोलदेखील केले होते.
हृतिक अनेकदा त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावतो. त्याचे त्याच्या एक्स-पत्नी सुझानबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्याच्या खासगी आयुष्यामुळे तो बऱ्याचदा चर्चांचे कारण बनतो.
दरम्यान, हृतिकच्या कामाबद्दल बोलायचे तर तो ‘क्रिश ४’ या चित्रपटात दिसणार आहे. २०२६ मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल असे म्हटले जात आहे. या चित्रपटातून तो दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.
