अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या तिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘बेबी डू डाय डू’ आणि दाक्षिणात्य अभिनेता यशच्या बहुचर्चित ‘टॉक्सिक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. स्त्री केंद्रीत अॅक्शनपट असलेला ‘बेबी डू डाय डू’ अलीकडेच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून, बॉक्स ऑफिसवर त्याची थेट टक्कर आलिया भट्ट आणि शरवरी वाघ यांच्या ‘अल्फा’ या चित्रपटाशी होत आहे.
मात्र, हुमा या दोन्ही चित्रपटांकडे स्पर्धेच्या दृष्टीने पाहत नाही. तिच्या मते, महिलाप्रधान अॅक्शनपटांसाठी सध्या अतिशय सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांसमोर दमदार महिला व्यक्तिरेखा असलेले अनेक चित्रपट पाहण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. हुमा दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक’ या चित्रपटाचाही भाग आहे. या चित्रपटाचा टीझर आणि यशच्या काही दृश्यांवर सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादाबाबतही तिने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली.
टॉक्सिकबद्दल हुमाची प्रतिक्रिया
एबीपीच्या वृत्तानुसार हुमा म्हणाली की, कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्याबद्दल टीका करणं योग्य नाही. तिने प्रेक्षकांना आवाहन केलं की, आधी संपूर्ण चित्रपट पाहावा आणि त्यानंतरच त्याबद्दल मत व्यक्त करावं. तिच्या मते, एखाद्या चित्रपटाबद्दल किंवा त्यातील कलाकारांबद्दल अपूर्ण माहितीच्या आधारे निष्कर्ष काढणे योग्य नाही.
न्यूड सीनबाबतही हुमा कुरेशीचं स्पष्ट मत
हुमा कुरेशीच्या अलीकडील वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. करिअरमध्ये आपण कधीही न्यूड सीन करणार नसल्याचं तिने स्पष्टपणे सांगितलं. या निर्णयामागचं कारण सांगताना हुमा म्हणाली, “माझे वडील, भाऊ आणि संपूर्ण कुटुंब आहे. त्यांना संकोच वाटेल किंवा त्यांना अस्वस्थ वाटेल, असं कोणतंही काम मला करायचं नाही.” कौटुंबिक मूल्ये आणि जबाबदाऱ्यांचा आदर करतच आपण हा निर्णय घेतल्याचंही तिने स्पष्ट केलं.
मात्र, याचवेळी तिने हेही स्पष्ट केलं की, न्यूड सीन करण्याचा निर्णय घेणाऱ्या इतर कलाकारांवर ती कोणतीही टीका करत नाही. हुमा म्हणाली, “अनेक कलाकार न्यूड सीन करतात आणि त्यामध्ये ते सहज असतात. मी त्यांच्या निर्णयाचा पूर्ण आदर करते.” तिच्या या मताचं सोशल मीडियावर अनेकांकडून कौतुक होत आहे.
