Who is Huma Qureshi Rumored Boyfriend Rachit Singh : बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी ही तिच्या दमदार अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणा यासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर ती सक्रिय असून, लाईफ अपडेट शेअर करीत असते. इन्स्टाग्रामवर हुमा व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसह शेअर करीत असते. मात्र, यावेळी तिच्या एका खास पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हुमा हिने सिनेविश्वातील एका खास व्यक्तीचे भरभरून कौतुक करीत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने त्या व्यक्तीची मेहनत, कामाप्रति असलेली निष्ठा आणि स्वभावाचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती म्हणजे रचित सिंह आहे. काही दिवसांपासून हुमा व रचित या दोघांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना या पोस्टमुळे आणखी उधाण आले आहे.

अभिनेत्री हुमा कुरेशीने इन्स्टाग्रामवर रचित सिंहचे काही फोटो शेअर केले आणि त्याच्या सिनेविश्वातील प्रवासाचे कौतुक करीत भावना व्यक्त केल्या आहेत. हुमाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘कॅमेरा सुरू होण्यापूर्वी काही गोष्टी आधीच लिहिलेल्या असतात. जेव्हा मी रचितला पहिल्यांदा भेटले, तेव्हा फक्त त्याची कला पाहून नाही तर त्याचा संयम पाहून आश्चर्यचकित झाले होते. त्याची ती शांत जिद्द पाहून प्रभावित झाले होते. बनारससारख्या छोट्या शहरातून आलेला हा तरुण मुंबईत काही स्वप्ने घेऊन आला होता. अशा स्वप्नांसह दररोज हजारो लोक मुंबईमध्ये येत असतात. फरक एवढाच की, त्याने कधी कष्ट करणे सोडले नाही.’

त्याने स्वतःच्या संधीची शांतपणे वाट पाहिली – हुमा

तिने पुढे लिहिले, “जेव्हा त्याला यश मिळाले नाही, तेव्हा त्याने हार मानली नाही. तो तिथेच टिकून राहिला आणि मेहनत केली. त्या काही गोष्टी शिकून घेतल्या आणि स्वतःमध्ये आवश्यक बदल केले. स्वतःची प्रगती केली. एक दशकाहून जास्त वेळ त्याने इतर कलाकारांना त्यांच्यातील अभिनय शोधून काढण्यासाठी मदत केली. अनेक कलाकारांना मार्गदर्शन केले, प्रशिक्षण दिले आणि त्यांच्यावर मेहनत घेतली. त्यापैकी अनेक जण पुढे जाऊन मोठे स्टार झाले. कॅमेऱ्याच्या मागे, रिहर्सल रूममध्ये आणि वर्कशॉपमध्ये राहून त्याने इतरांना घडवले आणि स्वतःच्या संधीची शांतपणे वाट पाहिली. त्याच्या याच गोष्टीचे मला खूप कौतुक वाटते,”

प्रामाणिकपणे काम केल्याचे हे फळ

हुमा कुरेशीने रचितसाठी लिहिले की, एक दिवस स्वतःची वेळही येईल. हा विश्वास त्याने कधीच सोडला नाही. कोणताही शॉर्टकट वापरला नाही किंवा कधीच अहंकार दाखवला नाही. फक्त अथक मेहनत घेत, कलेवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न केले. आता कुठे याचे फळ मिळू लागले आहे. ही एका रात्रीत मिळालेल्या यशाची गोष्ट नाही, तर वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करत राहिल्याचे फळ आहे. रचित तुझे या क्षेत्रात स्वागत आहे. तू सर्वांत कठीण टप्पा आधीच पार केला आहेस. आता हा मंच तुझा आहे, सिद्धू, अशी भावनिक पोस्ट हुमा कुरेशी हिने रचित सिंहसाठी केली आहे.

‘बेबी डू डाय डू’ चित्रपट कधी होणार रिलीज?

आगामी चित्रपट ‘बेबी डू डाय डू’मध्ये रचित सिंह प्रमुख भूमिका साकारणार आहे. सस्पेन्स थ्रिलर असलेल्या या चित्रपटात तो सिद्धूचे पात्र साकारणार आहे. त्यासह हुमा कुरेशीदेखील या चित्रपटामध्ये असणार आहे. येत्या ३ जुलै रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वी हुमाने कथित बॉयफ्रेंडसाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवर चित्रपट निर्माती फराह खान हिनेसुद्धा कमेंट केली आहे. रेड हार्ट इमोजी देत फराहने तिचे प्रेम व्यक्त केले आहे.

कोण आहे रचित सिंह?

रचित सिंह हा अनेक वर्षांपासून अभिनय प्रशिक्षक म्हणून काम करीत आहे. अनेक वर्षांपासून तो कलाकारांना अभिनयाचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. त्याने अनेक नवोदित कलाकार व लोकप्रिय अभिनेत्यांना अभिनयाचे धडे दिले आहेत. त्यांची अभिनय कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रे घेतली आहेत. आता ‘बेबी डू डाय डू’ चित्रपटातून रचित स्वतः एक अभिनेता म्हणून पडद्यावर झळकणार आहे. हुमा कुरेशी आणि रचित सिंह यांच्या रिलेशनशिपच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.