Huma Qureshi: ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सिनेमा आणि महारानी ही वेब सीरिज या दोन्हींमधील हुमा कुरेशीच्या भूमिका चांगलीच गाजल्या. तिच्या या अॅक्शन भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता हुमा लवकरच आणखी एका अॅक्शन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बेबी डू डाय डू’, असे तिच्या सिनेमाचे नाव आहे.
हुमाने नुकतीच पीटीआयला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत ती म्हणाली, “बेबी हे पात्र ठरावीक साच्यात बसवलेले नाही. ते सहजपणे गर्दीत मिसळून जाते. बेबी दिसायला अगदी सामान्य आहे; मात्र ती मारेकरी आहे. त्यामुळे गोष्टीत एक ट्विस्ट येतो. आम्हाला फक्त एक असं पात्र तयार करायचं होतं, जे लोकांना आपलंसं वाटेल. ‘बेबी’ ही अशी व्यक्ती आहे, जिला तुम्ही मुंबई लोकलमध्ये सहज भेटता आणि तिच्याकडे पाहून तुम्हाला काहीच फरक पडत नाही.”
हुमा कुरेशी नेमकं काय म्हणाली?
ती असेही म्हणाली, “उत्तम भूमिका लिहिण्याच्या बाबतीत अजून खूप बदल व्हायला हवा. बेबीसारखं पात्र उभं केलं, तशी भूमिका लिहिली गेली, हे पाऊल योग्य दिशेनं टाकलेलं आहे.”
बॉलीवूड सिनेमांमध्ये अगदी अलिकडील काळापर्यंत खलनायिका तसेच अॅक्शन भूमिका साकारणाऱ्यांच्या ग्लॅमरवर भर दिला जात असे. अजूनही काही सिनेमांमध्ये तसा भर दिला जातो. हुमा म्हणाली, “महिलांना घट्ट कपडे दिले जातात. त्यांनी सुंदर दिसावे याकडे कल असतो. अति लैंगिकीकरणावर भर असतो. मला वाटते की, ती गोष्ट पुरुषप्रधान संस्कृतीतून येते.”
ती पुढे असेही म्हणाली, “मला वाटते की, जेव्हा आपण अपंग व्यक्तींचा, विशेषतः महिलांचा विचार करतो, तेव्हा आपण त्यांच्याकडे कमकुवत म्हणून पाहतो. मात्र, बेबी डू डाय डू’ मध्ये अशी स्त्री आहे, जी अपंग आहे, जी महिला आहे; पण ती घातक आहे. तिचे अपंगत्व हा तिचा कमकुवतपणा नसून, उलट तीच तिची सर्वांत मोठी ताकद आहे,” असे ती म्हणाली.
‘बेबी डू डाय डू’ सिनेमाचे दिग्दर्शन निचिकेत सामंत यांनी केले आहे. हा सिनेमा ३ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमानंतर हुमा टॉक्सिक या अॅक्शन सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा २६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
