बॉलीवूडवर अंडरवर्ल्डचा प्रभाव असलेल्या काळात शाहरुख खानने आपल्या करिअरची सुरुवात करून मोठं यश मिळवलं. त्या काळात अनेक कलाकारांना अंडरवर्ल्डकडून येणाऱ्या धमक्या आणि खंडणीच्या मागण्यांना सामोरं जावं लागत होतं असं म्हटलं जातं. शाहरुख खानही याला अपवाद नव्हता अशीही चर्चा होती. नुकतंच दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी शाहरुखशी संबंधित एक किस्सा सांगितला. धमक्यांना घाबरून मागे हटण्याऐवजी शाहरुखने थेट “गोळी घालायची असेल तर घाला” असं सांगितल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘हुसैन जैदी फाइल्स’शी संवाद साधताना संजय गुप्ता यांनी सांगितलं, “शाहरुख खान चित्रपटसृष्टीतील एकमेव व्यक्ती होता ज्याला धमकी देण्यात आली तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितलं, मी हा चित्रपट किंवा शो कधीच करणार नाही. मी पठाण आहे, गोळी घालायची असेल तर घाला. मी तुम्हाला घाबरत नाही, पण तुमच्याबरोबर काम करणार नाही आणि तुमच्यासाठी कोणतेही शो करणार नाही. खरं तर त्याने त्यांचा आदर मिळवला. त्यांनाही कदाचित असं वाटलं असेल की, निदान एक तरी व्यक्ती असा आहे”.

शाहरुख खान काय म्हणालेला?

मात्र, या घटनांनंतर शाहरुख खान तब्बल तीन वर्षे कडेकोट सुरक्षा आणि पोलिसांच्या संरक्षणात राहत होता. कॉमेडियन आणि अभिनेत्री रूबी वॅक्स यांना दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत शाहरुख खानने १९९०च्या दशकात मिळालेल्या धमक्यांबद्दलही भाष्य केलं होतं. “ते नियोजन करतात आणि मग तुम्हाला सांगातात की, हे करा. कदाचित मी त्यांच्या दबावाला बळी पडलो नसतो, पण मग ते तुम्हाला गोळी घालू शकतात. त्यामुळे कधी कधी त्यांच्यासाठी एखादा चित्रपट करणंही चांगलं ठरतं” असं शाहरुख खान म्हणाला. यानंतर रूबी वॅक्सने आश्चर्य व्यक्त करत विचारलं, “तुम्ही खरंच असं म्हणत आहात की, कोणीतरी तुम्हाला फोन करून माझ्या चित्रपटात काम करा, नाही तर तुमच्यावर गोळी झाडू अशी धमकी द्यायचं?”.

अबू सालेमकडून शाहरुख खानला आलेले फोन

चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांनी त्यांच्या ‘King of Bollywood: Shah Rukh Khan and the Seductive World of Indian Cinema’ या पुस्तकात शाहरुख खानचा अंडरवर्ल्डबरोबर झालेला सामना आणि त्याच्याशी संबंधित घटनांचाही उल्लेख केला आहे. त्यांनी अबू सालेम, छोटा राजन आणि छोटा शकील यांसारख्या गँगस्टर्सबरोबर शाहरुखचा सामना कसा झाला, याबद्दल लिहिलं आहे.

अनुपमा चोप्रा यांच्या मते, शाहरुख खानच्या सुरक्षेबाबत १९९७ मध्ये प्रश्न उपस्थित झाला होता, जेव्हा तो महेश भट्ट यांच्या ‘डुप्लिकेट’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेले महाराष्ट्र पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी राकेश मारिया यांनी शाहरुखच्या जीवाला धोका असल्याची शक्यता महेश भट्ट यांना सांगितल्याचं वृत्त आहे. त्यानंतर शाहरुख खानच्या सुरक्षेसाठी त्याला वैयक्तिक अंगरक्षक देण्यात आला. अनुपमा चोप्रा यांनी आणखी एका घटनेची आठवण सांगितली आहे, ज्यात शाहरुख खानला थेट अबू सालेमचा फोन आला होता. अबू सालेमच्या जवळच्या निर्मात्याच्या चित्रपटात काम करण्यास शाहरुखने नकार दिल्यामुळे त्याने अभिनेत्याला फोनवरून शिवीगाळ केल्याचं सांगितलं जातं.

शाहरुख खान त्या काळात नैराश्यात आणि घाबरलेला असल्याचं सांगितलं जात असलं, तरी यादरम्यान त्याने संयम कायम ठेवला आणि परिस्थिती निवळवण्याचा प्रयत्न केला. अबू सालेमने एका विशिष्ट चित्रपटात काम करण्यासाठी शाहरुखवर दबाव टाकणं सुरूच ठेवलं. त्यावर अनुपमा चोप्रा यांच्या मते, शाहरुखने त्याला स्पष्टपणे सांगितलं, “मी तुम्हाला कोणाला गोळी मारायची हे सांगत नाही, त्यामुळे तुम्हीही मला कोणता चित्रपट करायचा हे सांगू नका.”

दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या आत्मचरित्र An Unsuitable Boyमध्येही ‘कुछ कुछ होता है’च्या प्रदर्शनापूर्वी अंडरवर्ल्डकडून मिळालेल्या धमक्यांबद्दल भाष्य केलं आहे. त्यावेळी शाहरुख खानने करणला या धमक्यांमुळे घाबरू नये, असा आत्मविश्वास दिला होता.
करण जोहरच्या मते, शाहरुख या धमक्यांमुळे दबावाखाली नव्हता. त्याने लिहिलं, “शाहरुख म्हणाला, काय फालतूपणा आहे! तो आत गेला आणि मला बाहेर खेचून आणलं. तो म्हणाला, मी तुझ्यासमोर उभा आहे. बघूया, कोण तुला गोळी मारतं ते. मी इथेच उभा आहे”.

करण जोहरने सांगितलं की, त्यानंतर शाहरुखने त्याच्या आईलाही धीर दिला. तो म्हणाला, “मी पठाण आहे. मला काहीही होऊ शकत नाही आणि तुमच्या मुलालाही काहीही होणार नाही. तो माझ्या भावासारखा आहे. त्याला काहीही होणार नाही.”