Bhagyashree on Juhi Chawla: भाग्यश्री नुकतीच ‘राजा शिवाजी’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिनेमात तिने जिजाऊंची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. राजा शिवाजी या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.
भाग्यश्रीला तिच्या पहिल्याच सिनेमातून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. मैंने प्यार किया या सिनेमात अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसली होती. या सिनेमात तिच्याबरोबर सलमान खान मुख्य भूमिकेत होता. प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतरही अभिनेत्रीने सिनेसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. तिने २० व्या वर्षी उद्योगपती हिमालय दासानी यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली.
अभिनेत्रीने नुकतीच ‘व्हरायटी इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने खूप कमी वयात सिनेसृष्टीपासून दूर जाण्याचा का निर्णय घेतला, याबद्दल वक्तव्य केले. ती म्हणाली, “मी खूप लहान होते आणि प्रेमात बुडालेले होते. मला लग्न करायचं होतं आणि माझ्या कुटुंबावर लक्ष द्यायचं होतं. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी माझं लग्न झालं होतं, मी प्रेग्नंट होते. कारण- चित्रपटाचं शूटिंग आणि तो प्रदर्शित होण्याचा काळ यामध्ये एक वर्षाचं अंतर होतं. प्रेमाची निवड करणं, लग्न करणं किंवा चित्रपट मिळवणं आणि प्रेम विसरून जाणं यापैकी मी माझ्या प्रेमाची निवड केली. प्रेमाला मी प्राधान्य दिलं. तेव्हा दोन्ही गोष्टी एकत्र मिळवणं शक्य नव्हतं.”
लग्नानंतर तिने घेतलेला एक निर्णय नंतर तिच्या पश्चात्तापाचे कारण ठरला. ‘मैने प्यार किया’नंतर भाग्यश्रीने ‘कैद में है बुलबुल’, ‘पायल’ व ‘त्यागी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये केवळ आपल्या पतीसोबतच काम करण्याचा निर्णय घेतला.
“मला माझ्या निर्णयांचा पश्चात्ताप…”
भाग्यश्री म्हणाली, “एक जण माझ्याकडे आले आणि म्हणाले की, त्यांना माझ्याबरोबर एक चित्रपट बनवायचा आहे. त्या सिनेमात माझ्या पतीनं माझ्या प्रियकराची भूमिका करावी, अशी इच्छा आहे. मी विचार केला, का नाही? ते करायला सर्वांत सोपं वाटलं. प्रेक्षकांना काय वाटेल याचा मी विचार केला नाही. त्याचे काय परिणाम होतील याचाही मी विचार केला नाही. आजही मला त्यासाठी टीका सहन करावी लागते; पण ठीक आहे. तरुणपणी तुमच्याकडून खूप चुका होतात आणि ही चूक त्यापैकीच एक होती. आम्ही मजा केली.”
भाग्यश्री मुख्य प्रवाहातील सिनेमांपासून दूर गेली. तिच्या निर्णयामुळे त्या काळातील काही मोठे चित्रपट निर्माते निराश झाले होते. ती म्हणाली की, यशजी मला ओरडले होते. मनमोहन देसाई मला म्हणालेले की भाग्यश्री, फक्त हो म्हण आणि मी उद्या चित्रपटाची घोषणा करेन. तू हा चित्रपट का करत नाहीयेस?
पुढे भाग्यश्री म्हणाली, “मला मी घेतलेल्या निर्णयांचा पश्चात्ताप नाही; पण त्यांच्याबरोबर काम करायला मिळायला पाहिजे होते, अशी एक इच्छा होती. घेतलेल्या निर्णयामुळे, मी काही महान चित्रपट निर्मात्यांसोबत काम करण्याची संधी गमावली. पण आयुष्य पुढे जातं आणि तुम्ही मागे वळून पाहत नाही.”
जुही चावला भाग्यश्रीला काय म्हणालेली?
त्यावेळी भाग्यश्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे ती तिच्या पिढीतील अनेक अभिनेत्रींना मागे टाकू शकली असती, असे म्हटले जाते. एकदा जुही चावला तिला काय म्हणालेली याची आठवण सांगत भाग्यश्री म्हणाली, “एकदा जुही मला म्हणाली होती की, तू इंडस्ट्री सोडलीस हे चांगलं झालं, नाही तर तू…, मला ते ऐकून छान वाटलं होतं.”
अभिनेत्री असेही म्हणाली, “मला वाटतं की, प्रत्येकाला पुरेशी संधी मिळत असते. तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक असलं पाहिजे. तसं केलं तरच तुमच्या कामाचं कौतुक होईल.”
दरम्यान, आगामी काळात अभिनेत्री कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
