अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या रोखठोक वक्तव्यांसाठी आणि तशाच प्रकारच्या खोचक पोस्टसाठी ओळखली जाते. अनेकदा तिला यासाठी ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. मात्र ट्रोलर्सची पर्वा न करता स्वरा भास्करने तिला जे वाटतं आहे ते कायमच व्यक्त केलं आहे. स्वरा भास्करने फहाद अहमदशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगीही आहे. तिने मुस्लिम तरुणाशी लग्न केल्यानेही तिला ट्रोल व्हावं लागलं होतं. अशात स्वराने नुकतीच एक खास भूमिका मांडली आहे.

काय म्हटलंय स्वरा भास्करने?

“समजा युद्ध झालं आणि माझ्यावर गोळी चालली, तर मी ती झेलायला तयार आहे. प्रत्यक्षात तुम्हाला गोळी लागते तेव्हा त्याचे परिणाम भोगावे लागतात. माझी मुलगी राबिया जन्माला यायची होती त्याआधी अभिनय हे माझं पहिलं प्रेम होतं. मला अभिनय करायला, वेगवेगळ्या भूमिका साकारायला खूप आवडत होतं. मला तितक्या संधी मिळाल्या नाहीत. मला वादग्रस्त अभिनेत्रीचा टॅग लागला. मला तो माझ्याच रोखठोक आणि बेधडक वक्तव्यांमुळे लागला याची मला कल्पना आहे. दिग्दर्शक, निर्माते, वितरक वाईटसाईट बोलू लागले. जेव्हा अशी प्रतिमा तयार केली जाते तेव्हा काय करणार? जे मी नाही ते मला कधी दाखवता येणार नाही. जी गोष्ट मला करायला आवडते ती मला करायला मिळाली नाही तर खूप वाईट वाटतं.” असं मत स्वराने मांडलं आहे. कनेक्ट सिनेला दिलेल्या मुलाखतीत स्वराने तिने हे वक्तव्य केलं आहे.

हे पण वाचा- शाकाहारी असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या ब्लॉगरवर स्वरा भास्कर भडकली; म्हणाली, “गायींचं दूध चोरून…”

..तर मी गुदमरुन मेले असते

“मी मला जे वाटतं ते मोकळेपणाने मांडत गेले. माझ्याबद्दल अनेकांना तक्रारी आहेत, असतील. मी अनेकांना आवडू किंवा नावडू शकते. अनेकजण माझा तिरस्कार, द्वेषही करतात. पण मी सगळ्यांशी समान पद्धतीने वागते. मी जर वेळोवेळी व्यक्त झाले नसते तर कदाचित गुदमरुन मेले असते. मी खऱ्या आयुष्यात जी व्यक्ती नाही तसं स्वतःला दाखवायचं असं कधी करुच शकणार नाही.” असं रोखठोक मत स्वराने मांडलं आहे.

मी जे केलं तो माझा निर्णय आहे

यानंतर स्वरा म्हणाली, मुक्तपणे बोलणं, माझी मतं मांडणं हा माझा निर्णय आहे. मी शांत राहणं पसंत केलं असतं. पद्मावत सिनेमातल्या जोहारच्या सीननंतर मला खुलं पत्र लिहिण्याची गरज नव्हती. पण मी शांत बसले नाही कारण ते माझ्या स्वभावातच नाही. ‘जहा चार यार’ या सिनेमात स्वरा झळकली होती. त्याबाबत फहाद अहमद काय म्हणाला? याबाबत विचारलं असता तो मला म्हणाला की तुझी या चित्रपटातली भूमिका तुझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. तरीही ती उत्तम वठवलीस. तू आणखी काम करायला हवं. आता तू अनेक गोष्टींबाबत मौन बाळग म्हणजे तुला चांगलं काम करता येईल. मला त्याचं बोलणं ऐकून समाधान वाटलं. चित्रपट म्हणावे तितके मिळाले नाहीत याचं दुःख मी कधी माझ्या आई वडिलांसमोरही व्यक्त केलेलं नाही. आता मी मुलीच्या जन्मानंतर त्याबाबत बोलते आहे. असंही स्वराने सांगितलं.