Aamir Khan writes a secret note before every flight: आमिर खान गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आमिर खानच्या मुलाचा जुनैद खानचा एक दिन हा सिनेमा आज (१ मे २०२६)ला प्रदर्शित झाला. यामध्ये साई पल्लवीदेखील प्रमुख भूमिकेत आहे. आमिर खान या चित्रपटाचा निर्माता आहे.
आमिर खान प्रत्येक विमान प्रवासाआधी करतो ‘ही’ गोष्ट
आता अभिनेता त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. हॉलीवूड रिपोर्टरला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने मोठा खुलासा केला. तो म्हणाला, “शूटिंग संपल्यानंतर आणि चित्रपट पोस्ट-प्रोडक्शनमध्ये असताना मी कायम मन्सूरसाठी एक चिठ्ठी लिहितो. माझं विमान क्रॅश झालं आणि माझे निधन झाले तर? या विचाराने मला काळजी वाटू लागते. चित्रपट चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर जाऊ नये, असे मला वाटते. त्यामुळे दिग्दर्शकांना सांगतो की मन्सूरचा सल्ला घ्या. मी मन्सूरला सगळ्या गोष्टींची काळजी घे, असे सांगतो. विमानाने प्रवास करण्यापूर्वी मी हे सर्व कायम करतो”, असे अभिनेता हसत म्हणाला.
तो पुढे असेही म्हणाला, “तो एक असा माणूस आहे ज्याच्या अंतःप्रेरणेवर मला पूर्ण विश्वास आहे.मी किरणलाही अनेक वेळा सांगितलं आहे की जर मला काही झालं, तर चित्रपटाबाबत मन्सूरचा सल्ला नक्की घ्या.”
यावर मन्सूर खान म्हणाले, “हे मला अलीकडेच माहित झाले आहे. त्यानंतर मला काळजी वाटू लागली आहे.” मन्सूर खान यांनी २००० ला प्रदर्शित झालेल्या जोश या चित्रपटानंतर दिग्दर्शनातून निवृत्ती घेतली. तरीही ते त्यांचा चुलत भाऊ आमिरला खानला वेळोवेळी मदत करतात. आमिरला मन्सूर खानचा पाठिंबा मिळतो.
इतकेच नाही तर आमिर खान एखाद्या सिनेमाची निर्मिती करत असतो आणि टीम जर नवीन असेल. जसे की दिग्दर्शक, कलाकार नवीन असतात त्यावेळी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. त्यावेळी आमिर खान मन्सूर खान यांना क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून सहभागी करून घेतो.
अब्बास टायरवाला दिग्दर्शित २००८ सालचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘जाने तू… या जाने ना’ या सिनेमात त्यांचा पुतण्या इमरान खान मुख्य भूमिकेत होता, त्यावेळी मन्सूर खान क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून सिनेमात सहभागी झाले होते. सुनील पांडे दिग्दर्शित ‘एक दिन’ या सिनेमात आमिरचा मुलगा जुनैद खान प्रमुख भूमिकेत आहे. यामध्येही मन्सूर खान सहनिर्माते आहेत.
१९८८ ला प्रदर्शित झालेल्या ‘कयामत से कयामत तक’, याबरोबरच, १९९५ ला प्रदर्शित झालेल्या ‘अकेले हम अकेले तुम’ तसेच, १९९४ ला प्रदर्शित झालेल्या जो जिता वही सिंकदर या सिनेमात आमिर खान व मन्सूर खान यांनी एकत्र काम केले आहे.
