scorecardresearch

“भाजपा सरकारच्या नाकाखाली त्याने सात लाख हिंदू काश्मिरी पंडितांचा…”; “काश्मीर फाइल्स अश्लील” टीकेवरुन दिग्दर्शकाचा संताप

गोव्याची राजधानी पणजी येथे सुरु असलेल्या ‘इफ्फी’च्या कार्यक्रमातील विधानावरुन नवा वाद

“भाजपा सरकारच्या नाकाखाली त्याने सात लाख हिंदू काश्मिरी पंडितांचा…”; “काश्मीर फाइल्स अश्लील” टीकेवरुन दिग्दर्शकाचा संताप
ट्विटरवरुन नोंदवलं मत (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

यंदाच्या वर्षी तिकीटबारीवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत असलेला ‘द काश्मीर फाईल्स’ सध्या गोव्यातील ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये (आयएफएफआय) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘इफ्फी’चे समिक्षक प्रमुख नदव लॅपिड यांनी केलेल्या विधानावर आता मनोरंजन क्षेत्रामधून प्रतिक्रिया समोर येत आहेत. ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरुन नवीन वादाला तोंड फुटलं असून अनेकांनी लॅपिड यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. गोव्यात आयोजित ५३ व्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना नदव लॅपिड यांनी हा चित्रपट ‘वल्गर’ म्हणजेच अश्लील आणि ‘प्रोपगंडा’ असल्याचं जाहीरपणे सांगितलं. या टीकेनंतर दिग्दर्शक अशोक पंडित यांनी थेट सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा उल्लेख करत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

गोव्याची राजधानी पणजी येथे सुरु असलेल्या ‘इफ्फी’च्या कार्यक्रमात इस्त्रायलमधील चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते असलेल्या लॅपिड यांनी रोकठोकपणे ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटासंदर्भात आपलं मत नोंदवलं. “द काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित झालो आहोत. हा चित्रपट म्हणजे त्रस्त करणार अनुभव आहे. हा चित्रपट आम्हाला व्हलगर (अश्लील) तसेच प्रपोगांडा (विशिष्ट उद्देशाने प्रचार करण्याच्या हेतूने बनवलेला) वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेचं आहे,” असं लॅपिड म्हणाले. त्यांच्या या भाषणाची छोटी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

नक्की वाचा >> IFFI च्या ज्युरी प्रमुखांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला म्हटलं ‘वल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’; अनुपम खेर यांनी दिलं उत्तर, म्हणाले “असत्याची…”

प्रसिद्ध दिग्दर्शक अशोक पंडित यांनी लॅपिड यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांच्या वक्तव्यामधून भारताच्या दहशतवादविरोधी लढाईची खिल्ली उडवल्याचं म्हटलं आहे. “इस्रायलचा चित्रपट निर्माता नावेद लॅपिडने ‘द काश्मीर फाइल्स’ला व्हल्गर चित्रपट म्हणत भारताच्या दहशतवादीविरुद्धच्या लढल्याची खिल्ली उडवली आहे,” असं अशोक पंडित ट्विटमध्ये म्हणाले. तसेच, “त्याने (लॅपिड यांनी) भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना त्यांच्या नाकाखालीच सात लाख काश्मिरी पंडितांचा अपमान केला आहे. हा प्रकार म्हणजे आयएफएफआय गोवा २०२२ च्या विश्वासार्हतेसंदर्भात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. शेम,” असंही या ट्विटमध्ये अशोक पंडित यांनी म्हटलं आहे.

यापूर्वीच्या अन्य एका ट्विटमध्ये अशोक पंडित यांनी थेट लॅपिड यांची नेमणूकच चुकीची असल्याचं म्हटलं. “माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नदल लॅपिड यांना इफ्फी ज्युरी हेड करणं सर्वात मोठी चूक होती. यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी अशोक पंडित यांनी केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 09:32 IST

संबंधित बातम्या