आमिर खानचा भाचा व अभिनेता इम्रान खान आता अभिनयापासून दूर आहे. इम्रानचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. इम्रानने आता त्याची एक्स पत्नी अवंतिका मलिकबरोबरचा घटस्फोट आणि मुलगी इमाराच्या संयुक्त पालकत्वाविषयी भाष्य केलं. इम्रान व अवंतिका सात वर्षांपूर्वी वेगळे झाले. इमारा गुरुवार ते रविवार त्याच्याबरोबर राहते. इतक्या वर्षांमध्ये त्याने कधीही मदतनीस ठेवलेली नाही.
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना इम्रानने सांगितलं की, तो गेल्या सात वर्षांपासून वेगळा राहतोय आणि सिंगल पॅरेंट म्हणून आपल्या मुलीचं संगोपन करतोय. या काळात त्याने कधीही मदतनीस ठेवली नाही. “मला ज्या गोष्टींमधून समाधान मिळते, ज्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्याबद्दलच मी बोलतोय. लेकीबरोबर घालवलेला वेळ माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे,” असं इम्रान म्हणाला.
मुलीची सगळी कामे स्वतः करतो इम्रान
इम्रानने सांगितलं की तोच मुलीला शाळेत सोडतो आणि तिला शाळेत सोडण्यासाठी किंवा रात्री झोपवण्यासाठी दुसऱ्या कोणाची मदत तो घेत नाही. मुलीचा वेळ इतर कोणालाही देणार नाही, असं इम्रानने स्पष्ट केलं. “माझी आणि माझ्या एक्स पत्नीने मुलीच्या संगोपनाची जबाबदारी विभागली आहे. गुरुवार ते रविवार, ती माझ्याबरोबर असते. मी तिला झोपवतो, रात्री तिला गोष्टी वाचून दाखवतो, सकाळी उठवतो, तिचा डबा भरतो, तिला शाळेत सोडतो आणि शाळेतून परत आणतो. कारण हे माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहे,” असं इम्रान म्हणाला.
गर्लफ्रेंड लेखाबद्दल म्हणाला…
इम्रानने म्हटलं की, लेखा वॉशिंग्टनला गर्लफ्रेंड म्हणावं की पार्टनर, हेच त्याला कळत नाही, कारण आता ते दोघेही चाळीशीत आहेत. आपल्या नात्यातील स्थिरतेचं श्रेय इम्रानने लेखा हिला दिलं. “एक चांगली पार्टनरशीप, नात्यात चांगला संवाद कसा असतो हे तिच्याकडून शिकण्याचा अनुभव खूपच चांगला होता. आम्ही दोघेही आमचे विचार मांडू शकतो. चर्चा करू शकतो. आमच्यात वाद होत नाहीत,” असं इम्रान खान म्हणाला.
इम्रान व अवंतिकाचे लग्न आणि घटस्फोट
इम्रान आणि अवंतिका यांनी एकमेकांना तब्बल १० वर्षे डेट केले होते. १० जानेवारी २०११ रोजी त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने नोंदणीकृत लग्न केलं होतं. त्यानंतर आमिर खानच्या घरी एक ग्रँड रिसेप्शन देण्यात आले होते. २०१४ मध्ये त्यांना इमारा नावाची मुलगी झाली. लग्नाच्या ८ वर्षानंतर, २०१९ मध्ये त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला. अवंतिकाने इम्रानचे घर सोडले आणि ती आपल्या पालकांकडे राहू लागली. काही काळाने त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या विभक्त होण्यामागे नेमके कोणते कारण होते, हे त्यांनी अधिकृतपणे कधीही सांगितले नाही. मात्र, इम्रानच्या अभिनय कारकिर्दीतील अपयश आणि वैयक्तिक मतभेद अशा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. सध्या इम्रान अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनला डेट करत आहे.

