Bollywood Actor Imran Khan Leave India Notice : सुपरस्टार अभिनेता आमिर खानचा पुतण्या आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांनी २८ ऑक्टोबरपर्यंत भारत देश सोडून जाण्याचे निर्देश देणारी नोटीस जारी केली आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्याच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
अमेरिकन नागरिकत्व असलेल्या अभिनेता इम्रान खानने काही दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. १० ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदानावर हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली होती. भारतीय नागरिक नसतानाही इमरान खान या राजकीय आंदोलनात सहभाग झाल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. तसेच या आंदोलनानंतर, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी देखील इम्रान खानच्या आंदोलनातील भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला होता.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, “मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अभिनेता आमिर खान यांचा पुतण्या, अभिनेता इम्रान खान याला ‘लीव्ह इंडिया नोटीस’ (भारत सोडून जाण्याची नोटीस) बजावण्यात आली आहे. या नोटीशीद्वारे त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं आहे. इम्रान खानने मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनात भाग घेतला होता. या आंदोलनानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. भारतीय नागरिक नसतानाही इम्रान खान या आंदोलनात सहभागी झाला होता.”
इम्रान हा अमेरिकेचा नागरिक असून त्याच्याकडे ‘ओव्हरसीज सिटीझन्स ऑफ इंडिया’ (OCI) कार्ड आहे. परदेशी नागरिकांना भारतात अशा राजकीय निदर्शनांमध्ये किंवा विनापरवाना आंदोलनात सहभागी होण्यास मनाई असल्याचं सांगत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, OCI कार्डधारकांना भारतीय नागरिकांप्रमाणे सर्व अधिकार मिळत नाहीत. भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना हे कार्ड दिलं जातं. त्यांना भारतात मतदान करता येत नाही. तसेच विधानसभा किंवा लोकसभा निवडणूकही लढवता येत नाही. भारतीय नागरिकांना मिळणारे सर्व राजकीय अधिकार OCI कार्डधारकांना मिळत नाहीत. OCI कार्डधारकांना परदेशी नागरिक आणि इमिग्रेशनविषयक नियमांचं पालन करावं लागतं. त्यांच्यावर परदेशी नागरिकांसाठी लागू असणारे नियम आणि अटीही लागू होतात. परदेशी नागरिकांना भारतात राजकीय स्वरूपाच्या आंदोलनात सहभागी होता येतं का, याबाबत संबंधित कायदे, व्हिसाच्या अटी आणि परिस्थिती तपासणं आवश्यक असतं. कोणत्या प्रकारचं आंदोलन होतं, त्या आंदोलनाला परवानगी होती का, लागू असलेल्या नियमांचं उल्लंघन झालं का अशा अनेक बाबी OCI कार्डधारकांच्या बाबतीत महत्त्वाच्या ठरतात.
