Bollywood Actor Imran Khan Big Statement on Politics: दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या बाजूने जाहीरपणे बोलणाऱ्या मोजक्या बॉलीवूड कलाकारांपैकी एक अभिनेता इमरान खान होता. दिल्लीतील आंदोलनकर्त्यांच्या समर्थनार्थ मुंबईत निघालेल्या मोर्चातही तो सहभागी झाला होता. आता एका नुकत्याच झालेल्या मुलाखतीत इमरानने सरकारवरील टीका आणि देशप्रेम या दोन गोष्टी वेगळ्या ठेवण्याची गरज असल्याचं म्हटलंय.

नागरिकांनी सरकारशी सहमत राहूनच आपलं देशप्रेम सिद्ध केलं पाहिजे, या कल्पनेवर इमरानने भाष्य केलं. कोणताही एक राजकीय नेता म्हणजे पूर्ण देश नाही. देशाची व्याख्या ठरवण्याचा अधिकार जितका एका नेत्याला आहे, तितकाच किंबहुना त्याहून जास्त अधिकार सामान्य नागरिकांना आहे, असं मत इमरान खानने व्यक्त केलं.

कोणताही नेता म्हणजे देश नाही – इमरान खान

‘युवा’ यूट्यूब चॅनेलशी बोलताना इमरान भाजपाला उद्देशून म्हणाला, “इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे कोणत्याही राजकीय नेत्यावर केलेली टीका ही देशावर केलेली टीका नसते. खरं तर कोणताही नेता म्हणजे देश नाही हे सांगण्याची गरजच पडू नये. कोणत्याही क्षणी अन्यायाविरुद्ध उभे राहणारे लोक हे या देशाचे नागरिक असतात. देश एका नेत्याइतकाच त्यांचाही असतो. लोकशाहीच्या नियमांनुसार, जर तुमची संख्या त्या नेत्यापेक्षा जास्त असेल, तर त्या एका नेत्यापेक्षा तुम्ही या देशाचे जास्त प्रतिनिधित्व करता.”

राजकारणी हे जनतेचे सेवक – इमरान खान

इमरान पुढे म्हणाला, “तुम्हाला देशावरील तुमचं प्रेम सिद्ध करावं लागतं, ही विचारसरणीही तुम्हाला दूर करावी लागेल. मी एका राजकारण्याला प्रश्न विचारत आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहात. जनतेमुळे तुमची एका विशिष्ट कामासाठी निवड झाली आहे. तुम्ही म्हणजे संपूर्ण देश नाही.”

सीजेपीच्या आंदोलनादरम्यान, संसदेकडे जाणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्या कारवाईबद्दल इमरानने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. “आज मला फार वाईट वाटतंय. पोलिसांनी ज्या प्रकारे आंदोलक विद्यार्थ्यांवर अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि त्यांना मारहाण केली… हे पाहून मी काय बोलावं? हे तेच विद्यार्थी आहेत ज्यांनी प्रचंड मेहनत केली, पण संपूर्ण व्यवस्थेने त्यांची निराशा केली. हे तेच लोक आहेत ज्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची विनंती केली, पण त्यांच्या पदरी फक्त निराशाच पडली. सत्ताधाऱ्यांनी त्यांना तुच्छ लेखलं आणि मारहाण केली. ही भारतमातेची लेकरं नाहीत का? जर हे नसतील, तर आपण कोणासाठी विकास करत आहोत आणि कोणाचे भविष्य सुरक्षित करण्याचा दावा करत आहोत? जे लोक शिक्षण सुधारणांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शिस्तीची अपेक्षा करतात, पण तेच उच्च दर्जाचे नियम आणि जबाबदारी सत्ताधाऱ्यांना लागू नाहीत,” असं इमरान खान म्हणाला होता.