People Quit Their Jobs After Watching This Movie : काही कलाकृती प्रेक्षकांना इतक्या भावतात की त्याचा त्यांच्या आयुष्यावर, विचारांवर प्रभाव होतो. अनेकदा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण स्वत:ची त्यातील पात्रांशी तुलना करतात. एखादा चित्रपट आल्यानंतर त्यातली नायकासारखी हेअर स्टाईल करणं, किंवा नायिकेसारखे कपडे परिधान करणं हा ट्रेंड काही आजचा नाही. पण, तुम्ही कधी असं ऐकलंय का की एक चित्रपट पाहिल्यानंतर तरुणांनी चक्क त्यांच्या नोकऱ्या सोडल्या.
होय २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या इम्तियाज अली दिग्दर्शित ‘तमाशा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर तरुणांनी अक्षरशा त्यांची नोकरी सोडली होती. रणबीर कपूरची क्रेझ त्यावेळी प्रचंड होती. आजही ती कायम आहेच पण, ‘रॉकस्टार’, ‘तमाशा’, ‘यह जवानी है दिवानी’ हे त्याच्या करिअरमधील गाजलेले चित्रपट. ज्याबद्दल त्याचे चाहते आजही तितक्याच आत्मीयतेने बोलतात. त्यामुळे त्याच्या भूमिका, चित्रपट हे त्यांच्यासाठी खूप जवळचा विषय. ‘तमाशा’मध्ये त्याने वेद वरदान सहानी ही भूमिका साकारलेली. जो चित्रपटात त्याच्या त्याच त्याच दररोजच्या आयुष्याला कंटाळलेला असतो आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छा त्याला त्रास देत असते. याचमुळे हा चित्रपट अनेकांना आपलासा वाटला आणि अनेकांना विचार करायला भाग पाडलं.
विशेषकरुन ऑफिसला जाणारे, करिअरमध्ये व्यग्र असलेल्या लोकांसाठी हा चित्रपट जणू वेकअप कॉल होता जो पाहिल्यानंतर त्यांना त्यांचं असतित्व, त्यांची ओळख, करिअर याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले. दररोजच्या त्याच त्याच गोष्टी करुन कंटाळलेल्या मंडळींना काहीतरी वेगळं करण्याची भूक सतावत होती, पण आपल्याला वाटेल ते करण्याची मुभा आणि संधी सगळ्यांना मिळत नाही. मात्र ‘तमाशा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर काहींनी चक्क त्यांची नोकरी सोडली होती असा किस्सा स्वत: दिग्दर्शक इम्तियाज यांनीच नुकताच एका मुलाखतीत सांगितला आहे.
‘में वापस आउंगा’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान इम्तियाज अली यांनी एक अनुभव सांगितला. ते म्हणाले की, बुमन इराणी यांनी लेखांसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी ते गेले होते. तिथे अनेक तरुण लेखक त्यांना भेटले आणि त्यांनी ‘तमाशा’ पाहिल्यानंतर नोकरी सोडून लेखक बनण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
न्यूज १८शी बोलताना इम्तियाज म्हणाले, “मला खूप अपराधी वाटतं. अनेक तरुण माझ्याकडे आले आणि म्हणाले की, तमाशा पाहिल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि आता ते लेखक झाले आहेत.” हे ऐकल्यानंतर इम्तियाज अली द्विधा मनःस्थितीत गेले. ते म्हणाले, “माझ्या मनात पहिला विचार आला की, देव करो आणि त्यांना यश मिळो.”
इम्तियाज यांनी पुढे सांगितले की, ‘तमाशा’मुळे प्रेरित होऊन आयुष्यात मोठे निर्णय घेणाऱ्या लोकांना पुढे अपयश मिळालं तर काय होईल, याची त्यांना सतत चिंता वाटते. ते म्हणाले, “जर त्यांना यश मिळालं नाही, तर त्यांच्या आयुष्यातील त्या अपयशासाठी मी स्वतःला जबाबदार समजेन. फक्त त्यांच्याच नाही, तर त्यांच्या कुटुंबाचीही जबाबदारी माझ्यावर असल्यासारखं वाटतं त्यांची पत्नी, मुलं आणि आई-वडिलांबद्दलही मला विचार येतो. कदाचित त्यांच्या आई-वडिलांची स्वप्नं असतील की त्यांचा मुलगा इंजिनिअर व्हावा आणि अमेरिकेत जाऊन काम करावं.”
इम्तियाज अली यांनी सांगितले की, या सगळ्याबद्दल त्यांच्या मनात संमिश्र भावना आहेत. ते म्हणाले, “याबद्दल माझ्या मनात संमिश्र भावना आहेत. कदाचित त्या अनेकांनी स्थिर आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून कलाकार होण्याचा निर्णय घेतला असेल, अगदी आपल्यासारखच, ते या इंडस्ट्रीत स्वतःला कलाकार म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
इम्तियाज पुढे म्हणाले, “मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. पण खरं सांगायचं तर, मी त्यांच्या जागी असतो तर मला आनंदच झाला असता. पैशांच्या दृष्टीने मी कधीच आयुष्याकडे खूप व्यवहारिक किंवा ठरवून पाहिलं नाही. शेवटी मला चांगलंही वाटतं, पण त्याचवेळी जबाबदारीची जाणीवही होते.”
काळाच्या ओघात ‘तमाशा’ हा असा दुर्मिळ चित्रपट बनला आहे, जो प्रेक्षक आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पुन्हा पाहतात आणि प्रत्येक वेळी त्यातून नवे अर्थ शोधतात. बॉक्स ऑफिसवर जरी या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाल नसला तरी हळूहळू समाजाच्या अपेक्षा आणि स्वतःच्या सर्जनशील समाधानामध्ये अडकलेल्या संपूर्ण पिढीसाठी हा चित्रपट खूप जवळचा ठरला.
