Sunny Deol Pakistan is aunt Statement : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक वेदनादायी घटना म्हणजे देशाची फाळणी. भारताचे दोन देशांत विभाजन झाल्याने असंख्य कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. याच घटनेवर आधारित ‘बटवारा १९४७’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले आहे. यामध्ये अभिनेता सनी देओल प्रमुख भूमिका साकारणार असून प्रीती झिंटाही या सिनेमात झळकणार आहे. चित्रपटाच्या नावामध्ये बदल करण्यावरून चर्चेत आलेल्या या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाचे कलाकार हे जोरदार प्रमोशन करत आहेत.

पटनामध्ये ‘बटवारा १९४७’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सनी देओलने चित्रपटाची कथा, कलाकार आणि चित्रपटामागील संकल्पना याबद्दल माहिती देत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली. माध्यमांशी संवाद साधताना त्याने विविध प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र, पाकिस्तानबाबत प्रश्न विचारताच सनी देओलने त्याचे वडील आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली.

काय म्हणाला सनी देओल

पटनामधील या कार्यक्रमामध्ये सनी देओलला एका माध्यम प्रतिनिधीने ‘बटवारा १९४७’ चित्रपटाचे शूटिंग हे पाकिस्तानमध्ये झाल्याने तेथील वातावरण आणि एक देश म्हणून पाकिस्तान कसा वाटला याबद्दल प्रश्न विचारला. यावर सनीने चित्रपटाचे शूटिंग हे पाकिस्तानमध्ये नाही तर भारतामध्ये झाल्याचे नमूद केले. सनी देओल म्हणाला, चित्रपटाचे शूटिंग हे तर पूर्णपणे हिंदूस्तानमध्येच झाले आहे. तिकडे शूटिंग केले नाही, त्यामुळे वेगळं काही वाटलं याबद्दल नाही बोलू शकत.”

पुढे तो म्हणाला, “वेगळं असं काय वाटणार, कारण दोन्ही देश तर पूर्वी एकच होते. जसे माझे वडील म्हणाले होते की, ‘जर भारत देश आपली आई आहे तर पाकिस्तान देश आपली मावशी आहे.’ माझ्या वडिलांचा हा डायलॉग तर सर्वांना माहीत आहे, त्यामुळे आपण सर्वजण कुठे ना कुठे एकमेकांना जोडलेले आहोत.”

राजकारणाशी जोडण्याचा आमचा कोणताही हेतू नसतो – सनी

पुढे सनी देओलने सिनेमा आणि राजकारण याबाबत मत व्यक्त केलं. एक कलाकार म्हणून, चित्रपटाच्या गोष्टीचं राजकीय चर्चेत रूपांतर न होऊ देता प्रेक्षकांसमोर कथा सादर करणं हीच जबाबदारी असल्याचं मत सनी देओलने व्यक्त केलं. राजकारणाबद्दल विचारताच तो म्हणाला, “मला या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त पडायचं नाही. आम्ही अभिनेते आहोत, आम्ही कथा सांगणारे लोक आहोत. आम्ही कथा निवडतो आणि त्या प्रेक्षकांसमोर सादर करतो. त्या कथांना राजकारणाशी जोडण्याचा आमचा कोणताही हेतू नसतो आणि आम्हाला तसं करायचंही नसतं, त्यामुळे त्या विषयावर मी काहीही बोलणार नाही.”

‘बटवारा 1947’ कधी होणार रिलीज?

दरम्यान, १९४७ साली भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘बटवारा 1947’ चित्रपट येत्या १४ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये एका कुटुंबाची कथा मांडण्यात आली आहे. त्या कुटुंबाचे आयुष्य हिंसा, भीती आणि सक्तीच्या स्थलांतरामुळे पूर्णपणे बदलून जाते. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात सनी देओलसोबत प्रीती झिंटा, शबाना आझमी, करण देओल आणि अली फझल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले आहे.