लोकप्रिय बॉलीवूड गायक अरिजीत सिंगने पार्श्वगायनातून निवृत्ती घेतल्याच्या निर्णयानंतर, गायकांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळतो का, यावर चर्चा सुरू झाली आहे. इतका मोठा कलाकार इंडस्ट्रीत टिकू शकत नसेल, तर प्रसिद्ध व लोकप्रियता नसलेले आणि कमी संधी मिळणाऱ्या कलाकारांची अवस्था काय असेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबद्दल मराठमोळा गायक अभिजीत सावंतनं आपलं मत मांडलं.

‘इंडियन आयडॉल’सारखा सिंगिंग रिअॅलिटी शो जिंकलेल्या अभिजीतने नंतर हिंदी आणि मराठीत अनेक गाणी गायली. त्याचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. त्यानं ‘बिग बॉस मराठी’ या शोमध्येदेखील सहभाग घेतला होता. गाण्यांद्वारे चर्चेत राहणारा अभिजीत त्याच्या रोखठोक मतांबद्दलदेखील चर्चेत राहिला आहे. अशातच त्यानं इंडस्ट्रीतल्या गायकांच्या मानधनाबाबत प्रतिक्रिया दिली.

पेंटाराईज स्टुडिओजच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत, अभिजीतला इंडस्ट्रीतल्या गायकांच्या मानधनाबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तर देताना थोडा संकोच करीत तो म्हणाला, “लोकांना गायक चित्रपटापेक्षा मोठा व्हायला नको असतो. म्हणूनच गायकांना ठरावीकच पैसे दिले जातात. आजही गाण्यांसाठी संगीतकार आणि गायकांना रॉयल्टी मिळत नाही. बिड्डूने (ब्रिटिश संगीतकार व गीतकार) ‘लफ्झों में’सारखं गाणं केलं, तसेच त्यानं पाश्चिमात्य देशांत काही गाणी केली. त्या फक्त दोन गाण्यांच्या रॉयल्टीवर तो आयुष्यभर आरामात जगू शकतो; पण आम्हाला आमचा उदरनिर्वाह चालेल, इतकं मानधन मिळत नाही.”

जेवढे पैसे मिळतात तेवढेच घेतो कारण…

तो पुढे म्हणाला, “इंडस्ट्रीत नव्या संधी मिळाव्यात यासाठी गायक कायम इच्छुक असतात. आपण गायलेल्या गाण्यावर एखादा मोठा स्टार लिपसिंक करत असेल, तर ते गाणं आयुष्यभर आपल्याला ओळख निर्माण करून देतं असं अनेक गायकांना वाटतं. म्हणूनच अलीकडे गायकांना मानधनापेक्षा मिळालेली संधी किंवा ठराविक निर्मात्याबरोबर काम करणं जास्त महत्त्वाचं वाटतं. अर्थात यामुळेच जेवढं मानधन दिलं जातं तेवढंच हे गायक स्वीकारतात. कारण, एकाने नकार दिल्यावर दुसरा कोणीही ते काम करण्यास तयार असतो.”

काही मोजक्या गाण्यांमधून प्रत्येकालाच जरी जास्तीची कमाई करता येत नसली तरी बिड्डूबाबत अभिजीतनं सांगितलेलं खरं आहे. बिड्डूनं कार्ल डग्लसचं आंतरराष्ट्रीय गाजलेलं गाणं ‘कुंग फू फायटिंग’ तयार केलं होतं. तसेच नाझिया आणि झोहेब यांच्या ‘डिस्को दिवाने’ या पाकिस्तानी अल्बमचं संगीतही त्यानंच दिलं होतं.

२०११ साली हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत असं समोर आलं होतं की, बिड्डूला आजही दर महिन्याला सुमारे ६० ते ७० हजार पाउंड्स इतकी रॉयल्टी मिळते. आजच्या दरानुसार ही रक्कम साधारणपणे ७४ ते ८४ लाख रुपये इतकी होते.

अभिजीत सावंतच्या गाण्यांबद्दल थोडक्यात

दरम्यान, अभिजीतबद्दल सांगायचं झालं तर, ‘मोहब्बतें लुटाऊंगा’, ‘जुनून’, ‘लफ्झों में’, ‘तेरे बिना’ या हिंदी आणि ‘सर सुखाची श्रावणी’, ‘ही चाल तुरू तुरू’, ‘गोरी गोरी पान फुलासारखी’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात’ यांसारख्या मराठी गाण्यांनी त्यानं सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे.