अभिनेत्री अनुष्का शर्मा ही चित्रपटांमधल्या तिच्या विविध प्रकारच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. अनेकांना तिचा अभिनय, तिचं स्टाईल स्टेटमेंट आवडतं. शिवाय ती विराट कोहलीची पत्नी आहे. या दोघांनाही सोशल मीडियाने विरुष्का असं नाव दिलेलं आहे. विराट कोहली T20 चा विश्वचषक जिंकल्यावर दोघंही प्रेमानंद स्वामींच्या आश्रमातही गेले होते. दरम्यान अनुष्काला तिच्या होमिओपॅथी पोस्टमुळे प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे त्यामुळे वाद का निर्माण झाला आहे आपण जाणून घेऊ.

अभिनेत्री अनुष्का शर्माची होमिओपॅथी पोस्ट काय आहे?

अभिनेत्री अनुष्का शर्माने एक पोस्ट केली आहे. ज्यात डॉ. राजन संकरन आणि नमिता थापर आहेत. अनुष्का म्हणाली, होमिओपॅथीचं माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण स्थान आहे. या सगळ्यात मला डॉ. राजन संकरन यांची उत्तम साथ लाभली. त्यांनी आरोग्याबाबत जे सल्ले मला दिले त्याचा मला फायदा झाला आहे. होमिओपथी खरंच गुणकारी आणि प्रभावशाली आहे. या आशयची पोस्ट अनुष्का शर्माने केली आहे. अनुष्का शर्माने ही पोस्ट करताच तिला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. काहींनी अनुष्काचं समर्थन केलंय. पण काहींनी मात्र अनुष्का शर्माला ट्रोल केलं आहे आणि होमिओपॅथी भंपक आहे असंही म्हटलं आहे.

Anushka Sharma and Virat Kohli
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. (फोटो-सोशल मीडिया)

अनुष्काच्या होमिओपथी पोस्टवर काय म्हणत आहेत नेटकरी?

अनुष्काच्या या पोस्टवर एक युजर म्हणतो विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा भारतीयांना होमिओपॅथी उपचार पद्धतीचा सल्ला देते आहे. आधी हे लोक भोंदू बाबांच्या पाठी लागले आहेत तेवढं पुरेसं नव्हतं का? आता चुकीच्या उपचार पद्धतीबाबत सल्ले देते आहे अनुष्का. होमिओपथीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. एखाद्या दिवशी अनुष्का तर असं सांगेल की तुम्ही प्रेमानंद महाराजांना भेटा तुमचे सगळे आजार बरे होतील. आणखी एक युजर या युजरला म्हणतो होमिओपॅथीला तू फ्रॉड म्हणतोय? तुला कदाचित मानसिक उपचारांची गरज आहे. जे आजार अॅलोपथी बरी करु शकत नाही अशा आजारांवरही होमिओपॅथी लागू पडते. त्यामुळे ही उपचार पद्धती चांगली आहे. अनुष्काचं काहीही चुकलेलं नाही असं उत्तर त्याने आधीच्या ट्रोलरला दिलंय.

काही जणांनी अनुष्काची बाजूही घेतली आहे

आणखी एक युजर म्हणतो, अनुष्काने तिला आलेला अनुभव सांगितला आहे. तिने काही कुणाला होमिओपॅथी उपचार पद्धती घ्या असा सल्ला दिलेला नाही. एवढंच नाही तर कुणालाही हे सांगितलेलं नाही की तु्म्ही अमुक एका बाबांचं दर्शन घ्या. तिला जे वाटलं ते तिने लिहिलं, तिचं मत व्यक्त केलं याकडे एवढंच पाहिलं पाहिजे. काही युजर्स तिची बाजू घेत आहेत. अनुष्काने काही चुकीचं लिहिलेलं नाही. मी होमिओपॅथी औषधं घेतो. माझ्यावर कुठलाही दुष्परिणाम झालेला नाही. शिवाय माझी आजारांशी लढण्याची प्रतिकारक शक्ती वाढली आहे हे मला जाणवं आहे. मला त्वचेसंबंधीचे काही आजार होते तेदेखील होमिओपॅथीमुळे बरे झाले असंही एका युजरने म्हटलं आहे. एका होमिओपॅथी डॉक्टरनेही अनुष्काला पाठिंबा दिलाय. तो म्हणतो मी होमिओपॅथी उपचार पद्धतीचा डॉक्टर आहे. मलाही ट्विटरवर तीन ते चार वर्षांपूर्वी लोकांनी खूप ट्रोल केलं होतं. अनुष्का तू होमिओपॅथीला पाठिंबा दिलास त्यासाठी तुझे मी आभार मानू इच्छितो. होमिओपॅथीला अनेक लोक उपचारपद्धतीच मानायला तयार नाहीत ही पूर्णपणे चुकीची बाब आहे. होमिओपॅथी ही एक यशस्वी उपचार पद्धती आहे. अनेकांना याचा गुण आला आहे असं या डॉक्टरने म्हटलं आहे.

Anushka Sharma News
अनुष्का शर्माच्या सोशल मीडिया पोस्टमुळे वाद का पेटला आहे? (फोटो-अनुष्का शर्मा, फेसबुक पेज)

मी आता अनुष्काचा फॅन नाही

आणखी एक युजर म्हणाला की अनुष्का शर्माचा मी फॅन आहे. पण तिची ही मतं वाचली आणि मला तिचा फॅन राहण्यात काहीही अर्थ वाटत नाही. पुढे हा युजर म्हणतो मॅडम तुमचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि तुम्ही होमिओपॅथीला पाठिंबा देताय? लोकांना उपचार मिळत नाहीत त्यामुळे अनेक लोक मरतात. अशात तुम्ही अशा प्रकारची भंपक उपचार पद्धती चांगली आहे म्हणता? होमिओपॅथीचा गुण येतो हे तुम्हाला कुठल्या भोंदू बाबाने सांगितलं? अशाच पद्धतीची कमेंट आणखी एका युजरने केली आहे. अनुष्का शर्माला हल्ली काय झालंय माहीत नाही. मला खरंच आश्चर्य वाटतं आहे की ती होमिओपथी प्रमोट करतेय. आधी भोंदू बाबाचा प्रचार केला आता चुकीच्या उपचार पद्धतीचा प्रचार करते आहे. अनुष्का तुझा निषेध असो.

अनुष्काची स्टोरी रक्त उसळवणारी असं का म्हणाला युजर?

अनुष्काची होमिओपॅथीबाबतची पोस्ट माझं रक्त उसळवणारी आहे असं एका युजरने म्हटलंय. अनुष्का काय किंवा तिच्यासारखे कुणीही सेलिब्रिटी असोत त्यांनी होमिओपॅथीचा प्रचार करुच नये. या होमिओपॅथीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. तुम्ही पब्लिक फिगर आहात त्यामुळे चुकीच्या गोष्टींचा प्रचार करण्याची जबाबदारी तुमची नाही. उलट तुम्ही सांगितलं पाहिजे की अशा भंपक गोष्टींच्या मागे लागू नका. अशा पद्धतीने अनेकांनी अनुष्काला नावं ठेवत ट्रोल केलं आहे.