आमिर खानची लेक आयरा खान सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. आयरा मानसिक आरोग्याबद्दल जाहीरपणे बोलत असते, तिच्या पोस्ट व व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. त्याचबरोबर ती तिचा मराठमोळा पती नुपूर शिखरे याच्याबरोबरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

नुपूर व आयराच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. दोघांची लव्ह स्टोरी खूपच भन्नाट आहे. आयरा आणि नुपूरची भेट एका जिममध्ये झाली होती. नुपूर शिखरे हा एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. आयरा जेव्हा तिच्या फिटनेसवर काम करत होती, तेव्हा नुपूर तिचा ट्रेनर म्हणून काम पाहत होता. सरावादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

आयराने दिलेली प्रेमाची कबुली

२०२० मधील लॉकडाऊन दरम्यान त्यांचं नातं खूप घट्ट झालं. आयराने सोशल मीडियावर नुपूरबरोबरचे फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. आयराने कबुली दिल्यानंतर आमिर खानचा होणारा जावई नुपूर शिखरे कोण? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. कारण नुपूर एका सर्वसामान्य घरातला मुलगा असून फक्त फिटनेसच्या आवडीमुळे त्या क्षेत्रात स्वतःचं नाव कमवत होता.

नुपूरने एका ‘आयर्नमॅन इटली’ स्पर्धेदरम्यान अतिशय फिल्मी स्टाईलने आयराला सर्वांसमोर प्रपोज केलं होतं, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या जोडीने ३ जानेवारी २०२४ रोजी मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर उदयपूरमध्ये एका भव्य सोहळ्यात त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने पुन्हा लग्न केलं होतं.

नुपूर व आयरा यांच्या वयातील अंतर किती?

लग्नानंतर नुपूर व आयरा खान यांच्या वयातील अंतराबाबत बरीच चर्चा झाली होती. कारण नुपूर आयरापेक्षा बऱ्याच वर्षांनी मोठा आहे. नुपूरने सांगितलं की आयराच्या कुटुंबाला दोघेही डेट करत आहेत, याची कल्पना होती. तसेच हा टाइमपास नसून दोघेही एकमेकांबद्दल गंभीर आहोत, हेही माहीत होतं. मित्र म्हणे पॉडकॉस्टमध्ये नुपूरने त्याच्या व आयराच्या वयातील अंतराबाबतही सांगितलं. आयराशी लग्न करताना वयातील अंतर हा मुद्दा अडचणीचा ठरला नव्हता.

आयराचा जन्म १९९७ साली झाला. तिचा पती नुपूर हा तिच्यापेक्षा तब्बल साडेबारा वर्षांनी मोठा आहे. नुपूरचा जन्म १७ ऑक्टोबर १९८५ रोजी झाला होता. तो ४० वर्षांचा आहे. नुपूर व त्याचे सासरे आमिर खान यांच्यात २० वर्षांचे अंतर आहे.