इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाई करत युद्धच पुकारलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा या कारवाईत मृत्यू झाला. या घटनेनंतर इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. दरम्यान सेक्रेड गेम्स या सीरिजमध्ये झळकलेली इराणी-जर्मन अभिनेत्री एलनाज नौरोजीने खामेनी यांच्या मृत्यूबाबत आनंद व्यक्त केला होता. तिची पोस्ट व्हायरल झाली होती. आता एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तिने इराणच्या शाळेत अमेरिकेच्या विध्वंसाचे धडे दिले जातात असं म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे एलनाज नौरोजीने?

इराणमध्ये महिलांना कुठलंही स्थान नाही. आत्ता तुम्हीच बघा तिथल्या महिला काय करत आहेत आणि मी काय करते आहे. इराणमध्ये महिलांंना जनावरणाप्रमाणे वागवलं जातं, कुठलीही संधी दिली जात नाही. मी जर्मनीत राहिले त्यामुळे मला अभिनय करायची संधी मिळाली. त्यानंतर मी भारतात आले, भारत लोकशाही मानणारा देश आहे. मला या ठिकाणी आल्यावर स्वातंत्र्य काय असतं त्याचा अनुभव आला. मी भारताची त्यासाठी जन्मभर ऋणी आहे. IANS या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य एलनाजने केलं आहे.

इरामध्ये अमेरिकेच्या विरोधी घोषणा दिल्या जातात

एलनाज या मुलाखतीत पुढे म्हणाली, “मी इराणमध्ये होते तेव्हा मला तिथली परिस्थिती कशी आहे हे आजही ठाऊक आहे. दडपशाही लादणाऱ्या इराणसारख्या देशात मी राहिले आहेत. मी अशा शाळेतही गेले आहे जिथे अमेरिकेच्या विध्वंसाचे धडे शिकवले जातात. इराणच्या शाळांमधलं चित्र हे आजही वेगळं नाही. अमेरिकेच्या विध्वंसाच्या घोषणा द्यायच्या आणि मग तुम्हाला शिकवायला सुरुवात केली जाते.” असं एलनाजने या मुलाखतीत म्हटलं आहे. तिचं हे वक्तव्यही चर्चेत आलं आहे.

अयातुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर एलनाज काय म्हणाली होती?

खामेनींचा मृत्यू हा इराणसाठी चांगला दिवस आहे असं म्हटलं आहे. एवढंच नाहीतर तिने म्हटलं आहे की इराणमध्ये अनेक वर्षे मानवाधिकारांचं उल्लंघन होत होतं. गेल्या काही वर्षांमध्ये इराणमध्ये अन्याय वाढला होता. आज चांगला दिवस आहे असं एलनाजने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच एका व्हिडीओत ती नाच करतानाही दिसते आहे, तसंच माझ्या मतांशी डाव्या विचारांचे लोक असहमत होते, आता त्यांना कळलं असेल की मी योग्य होते असंही एलनाजने म्हटलं आहे.इराणमध्ये जे काही घडलं त्याची वाट इराणमधले नागरिक मागच्या ४७ वर्षांपासून बघत होते. एवढंच नाही तर या युद्धात जर इराणमधल्या सामान्य नागरिकांचा मृ्त्यू झाला तर त्याची जबाबदारी इराण सरकारची असेल कारण ४७ वर्षांपासून इराणची जनता अन्यायच सहन करते आहे असंही एलनाजने म्हटलं आहे. खामेनी यांच्या मृत्यूची बातमी समोर आली तेव्हा एलनाजने म्हटलं की देव खूप महान आहे. खामेनी मारले गेले या गोष्टीची वाट इराणचे निवासी ४७ वर्षाांपासून बघत होते, आज आनंदाचा दिवस आहे असंही एलनाजने म्हटलं आहे.