Manoj Pahwa shares experience of working with Aryan Khan: शाहरुख खान हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटात काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. लवकरच, तो ‘द किंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आता शाहरुख खानच नाही तर त्याची मुलेदेखील बॉलीवूडमध्ये काम करत आहेत. सुहाना खान लवकरच त्याच्याबरोबर द किंग या चित्रपटात दिसणार आहे. तर आर्यन खानने बॅड्स ऑफ बॉलीवूडमधून दिग्दर्शनात करिअरला सुरूवात केली आहे.

या सीरिजमध्ये अनेक कलाकार काम करताना दिसले. विशेष म्हणजे आर्यन खान पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून काम करत असला तरीही या सीरीजचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. नेटफ्लिक्सवर हा शो सगळ्यात जास्त पाहिला गेला. तसेच, बॅड्स ऑफ बॉलीवूड अनेक दिवस ट्रेंड देखील होत होता. लक्ष्य लालवाणी, राघव ज्युयाल, मनोज पाहवा यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. अनेक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाले.

“मी नकार दिला…”

आता मनोज पाहवा यांनी नुकतीच माशाबल इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सुरुवातीला या सीरिजमध्ये काम करण्यास नकार दिला होता, असा खुलासा केला. तसेच त्यांनी नकार का दिला होता, याचे कारणही सांगितले.

मनोज पाहवा म्हणाले, “आर्यनने माझ्याकडून अशा गोष्टी करून घेतल्या, ज्या मी याआधी कधीही केल्या नव्हत्या. मी त्या भूमिकेसाठी कोणतीही ऑडीशन दिली नव्हती. त्याने मला बोलावले आणि सांगितले की तुम्ही ही भूमिका करावी असे मला वाटते. सुरुवातीला मी नकार दिला होता.”

त्यांनी आर्यन खानच्या सीरिजमध्ये काम करण्यास नकार का दिला होता, याचे कारण सांगत ते म्हणाले, “मी स्क्रीप्टसाठी विचारले होते,पण माझ्या मॅनेजरने सांगितले की ते कोणालाच स्क्रीप्ट देत नाहीत. त्यामुळे मी थोडा नाराज झालो. मी विचार केला की मीही काम करणार नाही. तो त्याच्या घरात आर्यन खान असेल, मी सुद्धा कोणापेक्षा कमी नाही. मी शाहरुखबरोबर काही चित्रपटात काम केले आहे, पण आमच्यात तसे काही बॉण्डिंग नाही.”

पुढे ते म्हणाले, “एका आठवड्यानंतर माझ्या मॅनेजरने मला फोन करून सांगितले की त्यांनी चार वेगळ्या स्क्रीप्ट पाठवल्या आहेत. मी त्या स्क्रीप्ट वाचल्या आणि मला आवडल्या. जेव्हा मी टीमला भेटलो तेव्हा त्यांनी सांगितले की सर प्लीज कोणाला सांगू नका की आम्ही तुम्हाला स्क्रीप्ट दिली आहे.कारण आम्ही इतर कोणाला स्क्रीप्ट दिली नाही. तुम्ही भूमिका नाकारली त्यामुळे तुम्हाला स्क्रीप्ट दिली.”

“दारू पिऊयात…”

मनोज पाहवा असेही म्हणाले, “जेव्हा आर्यनने मला ही भूमिका करण्यासाठी तयार केले, त्यावेळी त्याने माझ्याकडून अशा गोष्टी करून घेतल्या की आजपर्यंत प्रेक्षकांकडून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. अपशब्द वापरण्यास, शिवीगाळ करण्य़ास मी नकार द्यायचो. त्यावर तो मला म्हणत असे की सर तुमच्या तोंडून शिव्या चांगल्या वाटतात. कलाकार फक्त सुचवू शकतो, पण काय करायचे हा दिग्दर्शकाचा निर्णय असतो. त्याने हा शो खूप उत्तम बनवला आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. हा शो लोकप्रिय ठरला. त्यांनी आमचे पूर्ण मानधन दिले आणि खूप आदराने वागवले.”

जेव्हा शाहरुख खान सेटवर यायचा तेव्हा त्याच्याशी काय बोलणे व्हायचे, तो कसा वागायचा त्यावर मनोज पाहवा म्हणाले, “शाहरुख जेव्हा सेटवर यायचा तेव्हा तो खूप प्रेमाने वागायचा.” पुढे ते हसत म्हणाले तो नेहमी म्हणत असे, तुम्ही सगळे मन्नतला या, दारू पिऊयात.”

दरम्यान, आर्यन खान आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. याबरोबरच, द किंग या चित्रपटात शाहरुख खानबरोबर सुहाना खानदेखील दिसणार आहे.