Irrfan Khan Saved Tigmanshu Dhulia Life Drowning Story: दिवंगत अभिनेते इरफान खान यांचे बॉलीवूडमधील सेटवरील अनेक किस्से कलाकार शेअर करत असतात. नुकतेच दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी इरफानबरोबरची मैत्री आणि तीन वेळा जीव वाचवल्याचा किस्सा सांगितला आहे. तिग्मांशू व इरफान यांची मैत्री फक्त सिनेमांपुरती मर्यादित नव्हती तर ते अभिनयाचे शिक्षण घेत असल्यापासून एकत्र होते.
दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये (एनएसडी) इरफान खान व तिग्मांशू धुलिया एकत्र शिक्षण घेत होते. तेव्हापासून दोघांमध्ये मैत्रीचे घट्ट नाते असून इरफान यांनी तिग्मांशू यांचा तब्बल तीन वेळा पाण्यात बुडताना, बाहेर काढले होते. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तिग्मांशू म्हणाले, “मला पोहता येत नाही, पण मला पाण्याबद्दल कायमच एक वेगळंच आकर्षण राहिले आहे. इरफानने अनेकदा माझा जीव वाचवला. दोनदा… खरं तर तीन वेळा. पाणी मला एवढं का आवडतं हे माहीत नाही, पण पाणी मला खेचून घेतं.”
तिग्मांशू धुलिया मद्यधुंद अवस्थेत समुद्राकडे गेले अन्…
पुढे ते म्हणाले, “मी दिग्दर्शनामध्ये पदार्पण करण्यासाठी ‘हासिल’ सिनेमाची घोषणा केली. २००१ मध्ये हा माझा पहिलाच सिनेमा येणार असल्याचे जाहीर आम्ही पार्टी केली. यावेळी आम्ही मद्यपानही केले होते. त्यानंतर मी आणि इरफान दोघेही रात्री वर्सोवा बीचवर गेलो होतो. त्यावेळी समुद्रकिनारा रात्री सर्वांसाठी खुला असायचा. मद्यधुंद अवस्थेत मी समुद्राकडे गेलो आणि पुढे चालत राहिलो.”
इरफानने पाण्यात उडी मारली अन् जीव वाचवला
तिग्मांशू पुढे म्हणाले, “दारू प्यायल्यानंतर मी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली आणि समुद्राच्या दिशेने चालत गेलो. मी पाण्यात खूप आतपर्यंत गेलो होतो. इरफानही दारूच्या नशेत होता, पण त्याला पोहता येत होता. त्यावेळी मी काय करतोय हे त्याच्या लक्षात आलं. माझा पहिलाच चित्रपट खूप प्रयत्नांनंतर बनत असल्याचा एक वेगळाच उत्साह माझ्यामध्ये होता. त्यामुळे मी अक्षरशः वेडा झालो होतो. त्यानंतर मी पाण्यात पडलो. त्यावेळी इरफानने पाण्यात उडी मारली आणि मला बाहेर काढले होते.”
इरफान खान यांनी मारलेली कानाखाली
पुढे तिग्मांशू म्हणाले, “पाण्यातून बाहेर आल्यानंतर इरफानने मला दोन कानाखालीसुद्धा मारल्या होत्या. आणि म्हणाला, ‘काय करतोयस? मरशील नाय… निदान आधी चित्रपट तरी बनव.’”
यानंतर ‘साहेब, बीवी और गँगस्टर पार्ट २’च्या शूटिंगदरम्यानही अशीच घटना घडली. तलावाच्या पाण्यात गेल्यानंतर तिग्मांशू पाण्याखाली असलेल्या शेवाळात अडकले. त्यांचा ड्रायव्हर ‘सर गेले, सर गेले’ असं ओरडत होता. इरफानने पाण्यात उडी घेत सुखरूप बाहेर काढल्याचे तिग्मांशू यांनी सांगितले. तसेच तिसरी घटना नदीत राफ्टिंग करताना घडली होती. तिग्मांशू यांनी राफ्टमधून पाण्यात उडी मारल्यानंतर इरफानने त्यांना पुन्हा बाहेर काढले होते. त्यामुळे इरफानने तिग्मांशू यांना तीन वेळा पाण्यातून बाहेर काढल्याचे सांगितले आहे.
