करण जोहर हा बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता आहे. त्याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. ‘दोस्ताना’ हा चित्रपट त्यापैकीच एक. ‘दोस्ताना’ चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. करण जोहरची निर्मिती असलेला हा चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. त्याकाळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. या चित्रपटातील गाणी त्याकाळी बरीच गाजली होती.
‘दोस्ताना’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक दशकाहून अधिक काळ लोटला, तर गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या पुढच्या भागाची चर्चा सुरू आहे. यापूर्वी या चित्रपटामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन व जान्हवी कपूर झळकणार असल्याचं म्हटलं गेलं. परंतु, करण जोहरबरोबरच्या वैचारिक मतभेदामुळे कार्तिकने या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला होता. अशातच आता या संदर्भातील नवीन माहिती समोर आली आहे. ‘दोस्ताना २’ मध्ये अभिनेता विक्रांत मॅसी झळकणार अशी चर्चा सुरू आहे.
‘दोस्ताना २’मध्ये विक्रांत मॅसी कार्तिक आर्यनची रिप्लेसमेंट करणार असल्याचं म्हटलं जात आहे, तर जान्हवी कपूरच्या जागी कोणती अभिनेत्री झळकणार हे अद्याप समोर आलेलं नाही. ‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार करण जोहरची ‘धर्मा’ ही निर्मिती संस्था या चित्रपटाचं काम पाहत आहे; तर या चित्रपटात विक्रांत मॅसी व अभिनेता लक्ष्य लालवाणी पाहायला मिळणार असून या चित्रपटातील मुख्य नायिकेसाठी नवीन चेहऱ्याला पसंती दिली जाणार आहे. तर पुढच्या वर्षी जानेवारी २०२६ मध्ये चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, विक्रांत मॅसीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्याने तो अभिनय क्षेत्र सोडणार असल्याचं म्हटलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत कौटुंबिक कारणासाठी तो हे करत असल्याचं त्यानं म्हटलं होतं. परंतु, सध्या तो श्री श्री रविशंकर यांच्यावर आधारित चरित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. यानंतर तो ‘डॉन ३’ मध्येही झळकणार आहे.