This Marathi Actress Regrets Refusing Akshaye Khanna’s Dil Chahta hai : फरहान अख्तर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शकांपैकी एक आहे. ‘दिल चाहता है’ या चित्रपटातून त्यानं दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलेलं. त्याच्या या चित्रपटात लोकप्रिय कलाकार झळकलेले; पण तुम्हाला माहीत आहे का यामधून लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्रीही झळकणार होती.
‘दिल चाहता है’ हा बॉलीवूडमधील लोकप्रिय रॉम कॉम चित्रपटांपैकी एक आहे. त्यामध्ये अक्षय खन्ना, प्रिती झिंटा, सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सोनाली कुलकर्णी, आमिर खान हे कलाकार झळकले होते. आमिर, सैफ व अक्षय यामध्ये प्रमुख भूमिकांमध्ये होते. या चित्रपटात लोकप्रिय अभिनेत्री ईशा कोप्पीकरही झळकणार होती. अशातच आता तिनं या चित्रपटाला नाही म्हटल्याचा तिला पश्चात्ताप आहे, असं सांगितलं आहे.
ईशा कोप्पीकर हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं ‘डॉन’, ‘क्या कुल है हम’, ‘मेंने प्यार क्यू किया’, ‘३६ चायना टाउन’ आणि इतर काही हिंदी चित्रपटांत काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिनं ‘मात’ व ‘एफ यू’ यांसारख्या मराठी चित्रपटांतही काम केलं आहे.
ईशा कोपिकरने व्यक्त केली खंत
‘बॉलीवूड बबल’शी संवाद साधताना ईशा म्हणाली, ” ‘दिल चाहता है’ला नकार देणं माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी खंत आहे. मी ‘प्यार इश्क मोहब्बत’ हा चित्रपट साइन केलेला; पण मी त्या चित्रपटाच्या निर्मात्याला सांगू शकले असते की, मला दिल चाहता है हा चित्रपटही करायचा आहे किंवा मी त्यांना मला दिला चाहता है करायचं आहे म्हणून मी या चित्रपटातून बाहेर पडत आहे; पण मला त्यावेळी मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं आणि मी तत्त्वांच्या बाबतीत शिस्तप्रिय आहे. मी काटेकोरपणे ते पाळते. एकदा मी शब्द दिला की, मी माझंसुद्धा ऐकत नाही हा सलमान खानचा लोकप्रिय संवाद माझ्यासाठीच आहे,, असं मला वाटतं.”
ईशा पुढे म्हणाली, “मी त्यांचा विश्वातघात करू शकत नव्हते; पण मला असं वाटतं की, मी काहीतरी जुगाड करायला पाहिजे होता. एक तर मी दोन्ही चित्रपट करायला पाहिजे होते किंवा ‘दिल चाहता है’ची निवड करायला पाहिजे होती. प्यार इश्क मोहोबत्त तितका चालला नाही; पण ‘दिल चाहता है’ खूप गाजला.” ईशाला चित्रपटात सैफ अली खानच्या सहअभिनेत्रीच्या भूमिकेसाठी विचारणा झालेली, जे नंतर सोनाली कुलकर्णीनं साकारलं.
