शाहीद कपूर आणि त्याचा भाऊ ईशान खट्टर यांच्या वयात १५ वर्षांचे अंतर आहे. या दोघांचेही संगोपन त्यांची आई नीलिमा अझीम यांनी सिंगल मदर म्हणून केले. या दोघांना मोठं करण्यासाठी निलिमा यांनी एक नृत्यांगना आणि अभिनेत्री म्हणून आपल्या अनेक स्वप्नांचा त्याग केला. इशानने सांगितलं की त्याच्या आईने आपल्या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून, ज्या नोकऱ्यांमधून चांगले पैसे मिळतील अशी कामं केली.

लिली सिंगबरोबर बोलताना इशानने सांगितलं की, त्याच्या आईने वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी पंडित बिरजू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य करण्यास सुरुवात केली होती. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांचा फोटो एका टपाल तिकिटावर झळकला होता, हा एक खूप मोठा बहुमान होता. आईला आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका निभावताना आणि त्याच वेळी इतर सर्व गोष्टी सांभाळताना पाहिलंय, असं इशान खट्टरने नमूद केलं.

१५ वर्षांचं अंतर, मित्रांसारखे राहतो पण…

“मी लहानपणी माझ्या आईला एकाच वेळी अनेक भूमिका निभावताना पाहिलंय. मी माझ्यापेक्षा १५ वर्षे मोठ्या असलेल्या भावाबरोबर (शाहीद कपूर) मोठा झालो, त्यामुळे तो अनेक बाबतीत माझ्यासाठी पालकांसारखाच होता. आमचं नातं खूप रंजक आहे. आम्ही भावांपेक्षा मित्रांसारखे जास्त राहतो, पण त्यात आदर असतो. त्याने माझे डायपर्स बदलले आहेत, त्यामुळे आमचा कोणताही वाद ‘मी तुझ्यापेक्षा मोठा आहे’ याच वाक्याने संपतो,” असं इशान म्हणाला.

मी तिच्या आयुष्यात उशिरा आलो पण…

नीलिमा अझीम २१ वर्षांच्या असताना त्यांचे पहिले पती पंकज कपूर यांच्यापासून शाहीदचा जन्म झाला होता. नंतर ३६ व्या वर्षी त्यांचे दुसरे पती राजेश खट्टर याच्यापासून इशानचा जन्म झाला. इशान म्हणाला, “मी आईला तिच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यातून पुढे जाताना, आई म्हणून आम्हाला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करताना पाहणं हा एक वेगळा अनुभव होता. ती मोकळ्या विचारांची आहे. शाहीद झाला तेव्हा ती २१-२२ वर्षांची होती, त्यामुळे ते मित्रांसारखे होते. मी तिच्या आयुष्यात थोडा उशिरा आलो, तरीही तिने माझ्याबरोबरच तशीच मैत्रीची भावना कायम ठेवली. त्यामुळे मी तिच्याशी कोणतीही गोष्ट करू शकतो. मला वाटतं आता मी जो काही आहे, त्यात या गोष्टीचा खूप मोठा वाटा आहे. मला आनंद वाटतो की मला अशी आई मिळाली जिच्यापासून मला काहीही लपवण्याची किंवा खोटं बोलण्याची कधी गरज पडली नाही.”

इशान आईने केलेल्या त्यागाबद्दल म्हणाला, “आयुष्यात काहीतरी हवं असेल तर त्याग करावाच लागतो. पण नोकरी करणाऱ्या आणि मुलं सांभाळणाऱ्या महिला ज्या प्रकारे स्वतःचा विचार न करता झटत राहतात, त्या ‘सुपरवुमन’च असतात. मी माझ्या आईला असे अनेक निर्णय घेताना जवळून पाहिलंय. तिने स्वतःच्या आवडीचं व समाधान देणारं काम नव्हतं तरी ते फक्त घर चालवण्यासाठी आणि स्थिर उत्पन्नासाठी केलं.”

“तिच्यातील कलाकार हा तिच्या अस्तित्वाचा मोठा भाग आहे, पण तिने अनेकदा आपल्यातील कलाकाराला मागे ठेवून आईच्या भूमिकेला पुढे केले, आणि मी हे अनुभवलं आहे,” असं इशान खट्टरने नमूद केलं. यापूर्वी ‘झूम’ला दिलेल्या एका मुलाखतीत नीलिमा यांनी स्वतः खुलासा केला होता की, त्या वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी खिशात फक्त ४,५०० रुपये घेऊन मुंबईत आल्या होत्या आणि त्यांनी कधीही कोणाकडेही पैशांची मदत मागितली नाही.

इशान खट्टरचं भाऊ शाहीद कपूरबरोबरचं नातं

इशान खट्टर शाहीदला प्रेमाने ‘बाबा साशा’ म्हणतो. शाहीद भावनिकदृष्ट्या खंबीर आणि परिपक्व आहे, असं त्याने म्हटलं. दोन्ही भावात मैत्री आहे. तसेच शाहीदजवळच भावनिकदृष्ट्या सर्वात जास्त व्यक्त होत असल्याचा खुलासा इशानने केला. “तो माझी विचारपूस करण्यासाठी फोन करतो आणि मीही त्याची विचारपूस करण्यासाठी फोन करतो,” असं इशान म्हणाला. “जेव्हा मी त्याच्या चुका काढत असतो तेव्हा नाही, तर नंतर कधीतरी स्वतःहून विचार करताना तो त्या मान्य करतो. तो मला म्हणतो, ‘तुला माहितीये, १५ वर्षांपूर्वी मी जे केलं होतं ते चुकीचं होतं’,” असं इशान खट्टर भाऊ शाहीदबद्दल म्हणाला.