अभिनेता इशान खट्टर त्याच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकतंच इशानला एका चाहत्याने त्याच्या धर्माबद्दल विचारलं. त्याची आई नीलिमा अझीम मुस्लीम आहेत, तर त्याचे वडील राजेश खट्टर हे हिंदू आहेत. अशातच धर्मावरून विचारलेल्या या गुंतागुंतीच्या प्रश्नावर इशानने अतिशय गमतीशीर उत्तर दिले. त्याचे उत्तर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर एका ‘आस्क मी एनीथिंग’ सेशनदरम्यान एका चाहत्याने त्याला त्याच्या धर्माबद्दल विचारलं. यावर इशानने दिलेल्या उत्तराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याबरोबर दोन वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये झालेल्या संगोपनाबद्दल त्याला किती अभिमान वाटतो, तेही त्याने सांगितलं.

चाहत्याचा प्रश्न व इशान खट्टरचं उत्तर

एका यूजरने इशानला विचारलं, “तुझा धर्म कोणता आहे? मी थोडा कन्फ्यूज आहे.” या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याऐवजी इशानने लिहिलं, “जय जीजस, श्री अल्लाह, होली स्पिरिट दी फतेह.”

यानंतर इशानने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही एक पोस्ट शेअर केली, त्यातून त्याने स्वतःला कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक चौकटीत अडकून ठेवत नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्याने लिहिलं, “निसर्ग, दयाळूपणा, माणुसकी आणि सृजन.” या कॅप्शनबरोबर इशानने स्वतःचा एक छान फोटोही शेअर केला. यात तो रंगीबेरंगी ‘हॉट एअर बलून’ने सजलेल्या एका मनमोहक वातावरणात उभा असलेला दिसत होता.

Ishaan Khatter Religion
इशान खट्टरची पोस्ट

इशान खट्टर व शाहीद कपूर सावत्र भाऊ

इशान खट्टर बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूरचा भाऊ आहे. दोघेही सावत्र भाऊ आहेत. शाहीद आणि इशान या दोघांची आई अभिनेत्री नीलिमा अझीम आहेत. शाहीद हा नीलिमा अझीम आणि त्यांचे पहिले पती अभिनेता पंकज कपूर यांचा मुलगा आहे, तर इशान हा नीलिमा आणि अभिनेता राजेश खट्टर यांचा मुलगा आहे. दोघांचे वडील वेगळे असले, तरी शाहीद आणि इशान यांच्यात खूप घट्ट नातं आहे. हे दोघे अनेकदा एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसतात आणि अनेकदा ते एकमेकांबद्दल प्रेम आणि आदरही व्यक्त करतात.

धार्मिक विविधतेबद्दल इशान काय म्हणाला होता?

‘फिल्मफेअर’ला दिलेल्या एका मुलाखतीत इशान खट्टरने त्याच्या कुटुंबातील धार्मिक विविधता आणि त्यातून मिळालेल्या शिकवणीबद्दल चर्चा केली होती. त्याचे वडील पंजाबी हिंदू आहेत आणि आई मुस्लीम कुटुंबातील आहे. त्यांच्या मते, हाच खरा भारत आहे, जिथे वेगवेगळे धर्म आणि संस्कृती एकत्र येऊन एक सुंदर ओळख निर्माण करतात. विविधता हीच भारताची सर्वात मोठी ताकद आहे, असं इशानला वाटतं. वेगवेगळ्या संस्कृतींचं एकमेकांमध्ये मिसळणंच खास आहे आणि भारतीय असण्याची भावना कोणत्याही एका धर्मापुरती मर्यादित नाही, असं त्याने नमूद केलं. याच विचार आणि वातावरणात इशानचं संगोपन झालंय.

इशानने समाजाची एक दुसरी बाजूही पाहिली आहे. त्याच्या मते, अनेकदा लोक एखाद्या व्यक्तीला नीट न ओळखता किंवा न समजून घेता फक्त त्याच्या धर्माच्या आधारावर मत बनवतात. हा भेदभाव हळूहळू द्वेषामध्ये रुपांतरित होतो आणि लोकांमध्ये अंतर वाढतं, ही गोष्ट समाजासाठी योग्य नाही.

इशान खट्टरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो नुकताच दिग्दर्शक नीरज घायवान यांच्या ‘होमबाउंड’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. आता इशान लवकरच ‘जुगाडू’ या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहेत.