Ishaan Khattar New Home : मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं, असं अनेकांचं स्वप्न असतं. अनेक जण त्यासाठी त्यांच्या परीने शक्य तितके प्रयत्न करत असतात. सामान्य माणूस असो वा सेलिब्रिटी प्रत्येकाचं हे स्वप्न असतं. अशातच आता बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता इशान खट्टरने मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलं आहे.

इशान खट्टर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानं बॉलीवूडमध्ये करण जोहरच्या ‘धडक’ या चित्रपटातून मुख्य नायक म्हणून पदार्पण केलं. अलीकडे त्याच्या ‘होमबाउंड’ चित्रपटाला ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळाल्यानं तो चर्चेत होता. अशातच आता अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

इशान खट्टरने तब्बल ‘इतक्या’ कोटींना खरेदी केलंय नवीन घर

इशाननं मुंबईत आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. ‘सीआरई’च्या अहवालानुसार इशान खट्टरनं २९.३७ कोटींचं घर खरेदी केलं आहे. त्यासाठी इशाननं माध्यमांच्या वृत्तानुसार १.७६ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटीसाठी भरले आहेत. अभिनेत्यानं वांद्रे येथील पाली हिलमध्ये घर खरेदी केल्याची चर्चा आहे. इशाननं लहानपणी आर्थिक संघर्ष पाहिला असल्यानं त्याच्यासाठी हे कोट्यवधींचं घऱ खूप मोठी गोष्ट आहे.

अभिनेत्यानं बरखा दत्तशी संवाद साधताना त्याच्या संघर्षकाळाबद्दलची माहिती दिली. इशान म्हणालेला, “मी खूप लहान होतो. तेव्हापासून मी माझ्या घरच्यांना आर्थिक संघर्ष करताना पाहिलं आहे. सुदैवानं माझी आई काम करत होती. तिला एक टीव्ही शो मिळालेला, जो तिनं तीन महिने केला. दिल्लीत त्यांचं शूटिंग सुरू असायचं. त्यामुळे तिनं आम्हाला या सगळ्यातून बाहेर काढलं.”

अभिनेता पुढे म्हणाला, “मी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो आहे. आम्हाला बाहेर परदेशात शिक्षण घेणं परवडणार नव्हतं; पण आम्ही काही करून दुसरा मार्ग शोधायचो.” माध्यमांच्या वृत्तानुसार २०२४ मध्ये त्यानं त्याच्या मुंबईतील ३बीएचके घराची झलक दाखवलेली. अशातच आता अभिनेत्यानं अजून एक घर मुंबईत खरेदी केलं आहे.