बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या चित्रपटांमुळे, सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे किंवा मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. अभिनेता इशान खट्टरने नुकतेच ‘द परफेक्ट कपल’मधून हॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. एका मुलाखतीत त्याने बॉलीवूडमध्ये त्याला कोणत्या संकटाचा सामना करावा लागतो, याबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे.
काय म्हणाला इशान खट्टर?
अभिनेता इशान खट्टरने नुकतीच ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या करिअर आणि महत्त्वांकाक्षेबद्दल गप्पा मारल्या. त्याने म्हटले, “मला अर्थपूर्ण प्रोजेक्टमध्ये काम करायचे आहे, त्यामुळे तसे काम शोधण्यासाठी कोणतीही सीमा नसते. दर्जेदार काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.”
इशान खट्टर बॉलीवूडमध्ये काम मिळण्यासाठी कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, याविषयी बोलताना म्हणतो, “मी वयाच्या २१ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. मला बॉलीवूडमध्ये असे सतत सांगितले जाते की तू खूप तरुण दिसतोस. तरुण चेहऱ्यांसाठी आणि कलाकारांसाठी फार चांगल्या किंवा वाईट गुंतागुंतीच्या भूमिका लिहू शकत नाही, असे मला सांगितले जाते. ते माझ्यासाठी वेगळे आव्हान आहे. मला वाटते की, माझ्या अभिनयाबद्दल अयोग्य गृहितके आहेत. त्यामुळे बॉलीवूडमध्ये भूमिका मिळवण्यासाठी मला वेगळाच संघर्ष करावा लागतो. त्यामुळे माजिद माजिदी आणि मीरा यांच्याबरोबर कामाची सुरुवात झाली, यासाठी मी भाग्यवान असल्याचे मला वाटते.”
माजिद माजिदीच्या ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ आणि मीरा नायरच्या ‘अ सुटेबल बॉय’मधून आंतरराष्ट्रीय प्रकल्पांतून इशानच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. जान्हवी कपूरबरोबर ‘धडक’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. भारतीय चित्रपटसृष्टीत त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता हॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्याने स्पष्ट केले की, मला कोणत्याही एकाच इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे नाव कमवायचे नाही.
इशानने म्हटले, “मी कधीच कोणत्याही गोष्टी जास्त ठरवून ठेवत नाही. मी खूप भाग्यवान आहे की मला अशा संधी मिळाल्या. मी गेल्या सहा वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे आणि मला खूप चांगल्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. मला पहिल्यापासूनच वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करायचे आहे. मला कोणत्याही एकाच इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे नाव कमवायचे नाही, मला जर आता कोणी विचारले की, मला हॉलीवूडमध्ये की इथे जास्त काम करायला आवडेल; तर माझे उत्तर असेल की मला जिथे चांगले काम मिळेल तिथे मी काम करेन. मला मिळालेल्या कामाला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतो. मी या सगळ्याचा आनंद घेऊ शकतोय, कारण मला सुरुवातीलाच ते काम मिळाले. असे काम करायला मिळावे अशी अनेक जण आशा करत असतात.”
दरम्यान, ‘द परफेक्ट कपल’ ही वेब सीरिज ५ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे.