'द केरला स्टोरी’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करीत आहे. चित्रपटाने अलीकडेच २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला असला तरीही या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. चित्रपट निर्मात्यांपासून कलाकारांपर्यंत अनेकांना धमक्यांचे फोन येत आहेत. मॉरिशसमध्ये या चित्रपटावरून चित्रपटगृह मालकाला धमकीचे पत्र मिळाले आहे. मॉरिशसमधील 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी ISIS समर्थकांनी चित्रपटगृह मालकाला धमकीचे पत्र पाठवले आहे. हा चित्रपट दाखविल्यास संपूर्ण चित्रपटगृह बॉम्बने उडवले जाईल, असे या पत्रात लिहिले आहे. "सर/मॅडम, आम्ही चित्रपटगृहात बॉम्ब ठेवणार आहोत. उद्यापर्यंत याला उडवण्यात येईल. जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर आवडीने पाहा. उद्या यापेक्षा चांगला चित्रपट तुम्हाला बघायला मिळेल. आमचे शब्द लक्षात ठेवा," अशी धमकी पत्रात देण्यात आली आहे. हेही वाचा- आमिर खानच्या चित्रपटात काम करण्यास सलमान खानचा नकार; ‘हे’ कारण आलं समोर तर दुसरीकडे चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. चित्रपटगृह मालकांच्या मनात भीतीचे वातावरण असून आता चित्रपटाचे प्रदर्शन थांबण्यात आले आहे. तसेच चित्रपटाची स्टारकास्ट आणि निर्मात्यांना सतत धमक्या मिळत आहेत. ‘बॉक्स ऑफिस इंडिया’च्या वृत्तानुसार, ‘द केरला स्टोरी’ने रविवारी ४.२५ कोटींचे कलेक्शन केले आहे. यापूर्वी शनिवारी ४ कोटी आणि शुक्रवारी २.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होऊन २५ दिवस झाले आहेत. तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस म्हणजेच गुरुवारपर्यंत चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घसरण होत होती. पण वीकेंड येताच चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हेही वाचा- स्वत:चाच ‘हा’ चित्रपट पाहण्यास काजोलला आजही वाटते भीती; २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली…. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट केरळ राज्यातील मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर आणि ISIS सारख्या दहशतवादी संघटनांमध्ये त्यांची भरती या सत्यघटनेवर आधारित आहे. टीझर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. पश्चिम बंगालमध्येही या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, ती सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच रद्द केली. १५ ते २० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरात याची चर्चा होताना दिसत आहे.