Jyotika opens up about her Bollywood comeback & returning to Mumbai after 26 years : दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री बॉलीवूडमध्ये सक्रिय आहेत. यापैकीच एक म्हणजे ज्योतिका. ज्योतिकाने प्रियदर्शन दिग्दर्शिक ‘डोली सजा के रखना’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेलं. लोकप्रिय अभिनेता अक्षय खन्ना यामध्ये तिच्यासह मुख्य भूमिकेत होता. परंतु, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही. त्यानंतर ज्योतिकाने एक मोठा निर्णय घेतला आणि ती कायमची चेन्नईला गेली. परंतु, या निर्णयामुळेच ती पुढे जाऊन दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक बनली.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत ज्योतिकाने मुंबईहून चेन्नईला जाण्याचा निर्णय आणि पुन्हा २६ वर्षांनंतर मुंबईत परतण्याबद्दल आणि एकूणच या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्रीने एनडीटीव्हिला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने तिचा पहिला हिंदी चित्रपट खूप चांगला होता आणि त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही म्हणूनच ती चेन्नाईत गेली आणि पुढे जे झालं ते चांगलंच घडलं असं म्हटलं आहे.

चेन्नाईने सगळंच दिलं

ज्योतिकाने तिला तिच्या करिअरमधील सर्वात दमदार भूमिका दिल्याबद्दल तमिळ चित्रपटसृष्टीचं कौतुक केलं. ती म्हणाली, “मला चेन्नई खूप आवडते. हे एक पारंपरिक शहर आहे. याच शहराने मला काम दिलं, ओळख दिली आणि माझं कुटुंबही दिलं. मी मूक-बधिर व्यक्तीची भूमिका साकारली, अंध व्यक्तीची भूमिकाही केली. अभिनेत्री म्हणून ज्या-ज्या भूमिका करण्याची इच्छा होती, त्या सगळ्या मला इथे मिळाल्या. त्यामुळे ही माझ्यासाठी देवाची भेटच आहे.”

जन्म आणि शिक्षण मुंबईतच

तब्बल २६ वर्षांनंतर मुंबईत परतलेल्या ज्योतिकाने पुढे सांगितलं की, आता हिंदी चित्रपटसृष्टीत तिला तिच्या मनासारख्या वेगळ्या आणि दमदार भूमिका मिळत आहेत. ती म्हणाली, “आता हिंदी सिनेमात मला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मिळत आहेत. दक्षिण चित्रपटसृष्टीमुळे इथेही मला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. मला फारसा फरक जाणवत नाही. योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं महत्त्वाचं असतं.”

४७ वर्षीय ज्योतिकाने मुंबईपासून अनेक वर्षे दूर राहिल्यानंतर तिला कोणत्या गोष्टींची सर्वाधिक आठवण येत होती, याबद्दलही मनमोकळेपणाने सांगितलं. ती म्हणाली, “मला मुंबई खूप आवडते. माझं बालपण इथेच गेलं. माझा जन्म इथे झाला, शिक्षणही इथेच झालं. माझ्या शाळेसमोरचा रस्ता ओलांडतानाही जुन्या आठवणी जाग्या होतात. मुंबईतील पाणीपुरी, भेळपुरी, हिंदी बोलणं… अशा अनेक गोष्टींची मला खूप आठवण येत होती. खरं तर मुंबईबद्दलची प्रत्येक गोष्ट मला आवडते.”