सध्या ‘द 50’ या रिअॅलिटी शोची भारतात खूप चर्चा आहे. या शोमध्ये शिव ठाकरे, मिस्टर फैजू व कृष्णा श्रॉफ हे टॉप ३ स्पर्धक ठरले. जॅकी श्रॉफ यांची कन्या आणि फिटनेस आयकॉन कृष्णा श्रॉफने या शोमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. कृष्णा अफगाणिस्तानचा प्रसिद्ध एमएमए (MMA) फायटर अब्दुल अझीम बदक्षी (Abdul Azim Badakshi) याच्याबरोबर नात्यात आहे, तसेच त्याच्याबरोबर लिव्ह-इनमध्ये राहत असल्याची कबुली दिली आहे.
३३ वर्षांच्या कृष्णा श्रॉफने अब्दुल अझीमशी साखरपुडा केल्याच्या चर्चा होत आहेत. पण कृष्णाने अद्याप त्याबद्दल सांगितलेलं नाही. मात्र तिने या शोमध्ये तिने तिची अब्दुलशी झालेली ओळख, भेट आणि लिव्ह-इनचा निर्णय याबद्दल सांगितलं.
कुठे भेटले कृष्णा श्रॉफ व अब्दुल अझीम?
प्रिन्स नरुला आणि इतरांशी बोलताना कृष्णाने तिची लव्ह स्टोरी सांगितली. “त्याची मुंबईत एक मॅच होती. मी तिथे गेले होते, कारण माझा भाऊ टायगर त्याच्या विरोधात खेळणाऱ्या टीमचा सह-मालक होता. तिथे माझं त्याच्याकडे लक्ष गेलं. त्यानंतर मी माझे इन्स्टाग्राम डीएम (DMs) पाहिले, तिथे त्याने मला ‘हाय’ असा मेसेज पाठवला होता. मी त्याला रिप्लाय दिला आणि त्याने लगेच माझा नंबर मागितला. आजवर त्याच्या इतक्या आत्मविश्वासाने मला आजवर कोणीच अप्रोच केलं नव्हतं आणि मला त्याची हीच गोष्ट खूप आवडली. आमची मातृभाषा वेगळी आहे. तो पर्शियन बोलतो आणि मी इंग्रजी. आम्हा दोघांचेही हिंदी फार चांगले नाही. आधी ८ महिने आम्ही फक्त व्हिडीओ कॉल आणि फोनवर बोललो, त्यानंतर तो मला भेटण्यासाठी भारतात आला,” असं कृष्णा श्रॉफ म्हणाली.
गोव्यात व दिल्लीत एकत्र राहिले दोघे
पुढे कृष्णा म्हणाली, “आम्ही गोव्यात दोन आठवडे एकत्र राहिलो. मग जेव्हा विमानतळावर एकमेकांना बाय म्हणण्याची वेळ आली, तेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही कदाचित पुन्हा कधीच भेटणार नाही आणि आम्ही रडू लागलो. त्यानंतर तो त्याच्या मित्राला भेटायला दिल्लीला गेला आणि मी मुंबईला परतले. एक दिवस तो मला म्हणाला की तो अफगाणिस्तानला परत जात नाहीये, मग मी त्याला भेटायला दिल्लीला गेले. दिल्लीत आम्ही ३ आठवडे सोबत घालवले. त्या दिवसांत आमचं नातं खूप घट्ट झालं आणि मी त्याला विचारलं की, ‘तू मुंबईत माझ्याबरोबर राहशील का?’ मग आम्ही लगेच एकत्र राहायला सुरुवात केली. तो आता मुंबईतच राहतो.”
पुढे कृष्णा म्हणाली, “लोक मला नेहमी विचारतात की माझ्यासाठी प्रेम म्हणजे काय? तर माझ्यासाठी हेच प्रेम आहे की जेव्हा तुम्ही स्वतःपेक्षा समोरच्या व्यक्तीला जास्त महत्त्व देता. त्याचा आनंद माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. तो खूश असेल तर मी खूश असते. आम्ही कधीही नात्यात यायचा विचार केला नव्हता, पण आमचे विचार आणि स्वभाव एकमेकांशी इतके जुळले की आम्ही एकत्र आलो. आमचा हा प्रवास खूप धाडसी व आव्हानात्मक राहिला आहे. अशा अनेक गोष्टी घडल्या ज्याबद्दल मी आत्ता कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाही.”
