Jackie Shroff Devdas Movie Chunnilal Role Secret: बॉलीवूडचे भिडू अर्थात जॅकी श्रॉफ यांनी आपल्या खास शैलीतील अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. एकेकाळी हटके स्टाइलने सिनेविश्वामध्ये वेगळी ओळख निर्माण केलेल्या जॅकी दादांनी ‘देवदास’ या सिनेमामध्ये चुन्नीलाल ही भूमिका साकारली होती. संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमामध्ये काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण, तरीही अनेक कलाकरांनी ही भूमिका नाकारल्यानंतर ती जॅकी श्रॉफ यांना मिळाल्याची आठवण त्यांनी स्वतः सांगितली आहे.

‘रिपब्लिक भारत’ला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी ‘देवदास’च्या आठवणी सांगितल्या. यावेळी प्रेक्षक म्हणून आलेल्या एका महिलेने हा चित्रपट पाच वेळा पाहिल्याचे सांगितले. त्यावर जॅकी श्रॉफ म्हणाले, “’देवदास’ची मुख्य भूमिका शाहरुख खान करत असल्याने कोणीही चुन्नीलाल ही भूमिका स्वीकारत नव्हते. ज्यांना या भूमिकेची ऑफर दिली जात होती ते म्हणायचे, सिनेमामध्ये तर भूमिकेचे नावही कुठे नाही. सिनेमाचं नावही ‘देवदास’ आहे, त्यामुळे कोणीही ही भूमिका स्वीकारण्यास तयार नव्हते.”

जॅकी श्रॉफ यांनी का स्वीकारली ‘देवदास’मधील भूमिका?

पुढे ते म्हणाले, “अनेकांनी नकार दिल्यानंतर पुढे ही भूमिका माझ्याकडे आली, तेव्हा मी सिनेमामध्ये काम करण्यासाठी होकार दिला. माधुरी दीक्षितजी या चित्रपटात आहेत आणि त्यांच्या व्यक्तिरेखेचं म्हणजेच चंद्रमुखीचा कोठा चालवणारा मी मालक आहे, मग मी तिथे का बसू नये असा विचार मी केला. मी त्यांना म्हणालो, ‘खूप छान.’ त्यानंतर मी विचारलं की, माझ्यासाठी अजून सिनेमामध्ये काय असणार आहे?”

यावर त्यांनी सांगितलं, ‘तुमच्यासाठी एक गाणं आहे आणि काही डायलॉग आहेत.’ मी डायलॉग वाचले आणि म्हणालो, ‘माझी भूमिका मध्यंतराच्या वेळी आली तरी मला काही फरक पडणार नाही, कारण मी फक्त उभा राहिलो तरी लोकांचे माझ्याकडे लक्ष जाईल आणि ‘देवदास’मध्ये लोकांनी मला पाहिलं व त्यांना काम आवडलं.”

पुढे जॅकी श्रॉफ यांनी महिलेला विचारले, “तुम्हीही हा चित्रपट पाहिला, मी दिसलो होतो ना?” पुढे ते म्हणाले, “जेव्हा कोणीही भूमिका स्वीकारत नाही, तेव्हा ती माझ्याकडे येते आणि मला ती स्वीकारण्यात काहीही त्रास होत नाही.”