Jackie Shroff Routine : “ए भिडू, क्या हाल?” एकंदर ‘भिडू’ हा शब्द ऐकल्यावरच अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा चेहरा प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर येतो. जॅकी श्रॉफ यांची हटके भाषा, त्यांची देहबोली याची नेहमीच चर्चा होत असते. बॉलीवूड चित्रपटांमध्येही त्यांनी स्वत:ची एक वेगळी स्टाईल निर्माण केली आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी जॅकी श्रॉफ यांचा उत्साह आजच्या तरुणाईला लाजवेल असाच आहे. त्यांनी नुकत्याच ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या फिटनेस रूटीनविषयी सांगितलं आहे.
जॅकी श्रॉफ यांच्या फिटनेसची चर्चा नेहमीच होत असते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या अतरंगी जीवनशैलीवर भाष्य केलं आहे. जॅकी श्रॉफ म्हणाले, “माझं रूटीन तुम्ही फॉलो केलंत तर नक्कीच बँड वाजेल. मी रोज फक्त ६ तास झोपतो आणि मला प्रचंड गोड पदार्थ खायला आवडतात.” त्यांच्या या अजब डाएटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दिवसाचे एकूण २४ तास असतात…यापैकी ८ तास झोप, ८ तास काम आणि ८ तास स्वत:ला वेळ देण्याचा खूप प्रयत्न केला पण, ते शक्य होत नसल्याचं जॅकी श्रॉफ सांगतात.
जॅकी श्रॉफ म्हणतात, “माझं रूटीन तुम्ही फॉलो केलात, तर नक्कीच तुमची बँड वाजेल. मी ६ तास झोपतो. मला गोड पदार्थ खायला खूप आवडतात…माझ्या आहारात सीझनल फळांचा समावेश असतो. आता आंब्याच्या सीझनमध्ये मी खूप आंबे खाल्लेत. जिलेबी, गुलाबजाम, रसमलाई, फिरनी, मावा केक, खीर, शिरा…हे सगळे गोड पदार्थ मला भरपूर आवडतात. आता सर्वांना वाटतं की, माझं काहीतरी वेगळं रूटीन आहे पण असं काही नाहीये. मी हेल्दी राहण्यासाठी रोज थोडं वर्कआऊट करतो कारण, मी दररोज व्यायाम, वर्कआऊट केलं पाहिजे हा माझ्या मुलांचा आग्रह असतो. मी सुद्धा त्यांचं मनापासून ऐकतो आणि व्यायाम करतो. पण, मी सर्वांना एक गोष्ट आवर्जून सांगतो…गोड खाण्यात मला फॉलो करू नका. मी प्रचंड गोड खाऊ शकतो…कारण, मला गोडाचे पदार्थ आवडतात. हे पदार्थ मी रात्री खातो, पण तुम्ही असं अजिबात करू नका.”
टायगर आणि कृष्णा दोघंही खूप जास्त फिटनेसकडे लक्ष देतात. तुम्ही घरी त्यांच्या आवडीचे कोणते पदार्थ बनवता…किंवा दोघांच्या आहारात काय असतं? यावर जॅकी श्रॉफ पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, “भात-डाळ आणि तूप…हे दोघांच्याही आहारात असतं. मलाही हे असं साधं जेवण फार आवडतं. याशिवाय मी जेवणानंतर आल्याचं पाणी पितो.”
दरम्यान, जॅकी श्रॉफ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच ते ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमात झळकणार आहे. याशिवाय हे ज्येष्ठ अभिनेते शाहरुख खानच्या ‘किंग’ सिनेमातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. या दोन्ही चित्रपटांमध्ये दमदार कलाकारांची मांदियाळी असणार आहे.
