बॉलीवूडचे लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांचं निसर्गप्रेम आता सर्वश्रूत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ते नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. जॅकी श्रॉफ कोणत्याही कार्यक्रमाला किंवा लग्नसमारंभाला गेल्यावर त्यांच्या मित्रमंडळींना लहान रोपटं भेट म्हणून देतात. ‘झाडे लावा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश ते या माध्यमातून देतात. त्यांचं निसर्गाच्या सानिध्यात खंडाळा येथे सुंदर फार्महाऊस सुद्धा आहे. याठिकाणी नुकतीच ज्येष्ठ मराठी अभिनेत्री स्मिता जयकर यांनी भेट दिली होती. याचे खास फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
स्मिता जयकर यांनी आजवर बऱ्याच गाजलेल्या बॉलीवूड सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे संजय लीला भन्साळी, जॅकी श्रॉफ अशा अनेक कलाकारांचं त्यांच्या घरी येणं-जाणं असतं. नुकत्याच स्मिता जयकर जॅकी श्रॉफ यांचं आलिशान फार्महाऊस पाहण्यासाठी गेल्या होत्या.
स्मिता यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये जॅकी श्रॉफ यांच्या संपूर्ण फार्महाऊसची आणि येथील पाळीव प्राण्यांची झलक पाहायला मिळतेय. घोडे, गायी, सरडा, ससे या प्राण्यांची जॅकी श्रॉफ यांच्या फार्महाऊसवर देखभाल केली जाते. स्मिता जयकर म्हणतात, “जॅकी श्रॉफ यांचं संपूर्ण फार्महाऊस पाहिलं…किती सुंदर जागा आहे.”

चाहत्यांनी सुद्धा या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जॅकी श्रॉफ यांचं सुंदर फार्महाऊसपाहून चाहतेही भारावून गेले आहेत.
श्रॉफ कुटुंबीयांचं हे फार्महाऊस आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण आहे. विशेष म्हणजे जेवण बनवण्यासाठी गॅस असला तरीही, पारंपरिक चुलीची मांडणीही करण्यात आली आहे. याठिकाणी आजवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी भेट दिली आहे.

कलाविश्वात रमणारे जॅकी शेती करण्यातही तितकेच रमतात. त्यामुळे त्यांनी फार्महाऊसवर सेंद्रिय शेती सुद्धा केली आहे. याठिकाणी भव्य स्विमिंग पूल सुद्धा आहे. या फार्महाऊसला चहुबाजूंनी डोंगरांनी वेढलं असून समोर खुलं मैदानदेखील आहे. मध्यंतरी जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयशा श्रॉफ यांनी या फार्महाऊसचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. याशिवाय फराह खानच्या युट्यूब व्हिडीओमध्येही चाहत्यांना जॅकी श्रॉफ यांचं फार्महाऊस पाहायला मिळालं होतं.
