Jackie Shroff on the National Award : ९० च्या दशकात एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. विशेष म्हणजे या चित्रपटात नायकाइतकीच खलनायकाची भूमिकाही प्रचंड गाजली होती. हा चित्रपट म्हणजे ‘खलनायक.’ बल्लू, गंगा आणि राम या तिघांभोवती फिरणाऱ्या या कथेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. ॲक्शन, ड्रामा आणि दमदार गाण्यांमुळे ‘खलनायक’ सुपरहिट ठरला होता. संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते. आता पुन्हा एकदा हे तिघे एकत्र काम करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, ‘खलनायक रिटर्न’मध्ये ते एकत्र काम करणार असल्याचे बोलले जात आहे. यावर जॅकी श्रॉफ यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
अभिनेते जॅकी श्रॉफ हे सहा वर्षांनंतर चित्रपटामध्ये पुनरागमन करत आहेत. २०२० मध्ये रिलीज झालेल्या ‘बागी’ चित्रपटानंतर आता जॅकी ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटामध्ये झळकणार आहेत. तीन दशकांनंतर आजही जॅकीची लोकप्रियता आणि क्रेझ कमी झालेली नाही. रोमँटिक हिरो म्हणून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जॅकी श्रॉफ यांचा १९९४ साली प्रदर्शित झालेला ‘खलनायक’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. चित्रपटातील गाणी जबरदस्त गाजली होती, त्यामुळे ‘खलनायक’ चित्रपटाच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘खलनायक रिटर्न’बाबत चर्चा सुरू असताना जॅकी यामध्ये झळकणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत अद्याप माझ्यापर्यंत चित्रपटाची स्क्रीप्ट आलेली नाही, अशी प्रतिक्रिया जॅकी श्रॉफ यांनी दिली आहे.
‘खलनायक रिटर्न’मध्ये जॅकी श्रॉफ झळकणार का?
जॅकी श्रॉफ यांनी ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘खलनायक रिटर्न’ चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. जॅकी श्रॉफ म्हणाले की, ‘खलनायक’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. अजून माझ्यापर्यंत स्क्रीप्ट पोहोचलेली नाही. संजू बाबाचे ‘खलनायक’मधील पोस्टर्स तर आधीच प्रदर्शित झाले आहेत; आता फक्त पोलिस अधिकारी राम सिन्हा आणि त्यांची धर्मपत्नी मागे राहिले आहेत,” अशी मिश्कील टिप्पणी जॅकी श्रॉफने केली आहे. याचबरोबर अभिनेत्री माधुरी दीक्षितने ‘खलनायक’ चित्रपटाच्या सिक्वेलबाबत प्रतिक्रिया दिली होती. माधुरीने ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सध्या तरी निर्मात्यांशी तिच्या कास्टिंगबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे सांगितले आहे.
रोमँटिक हिरो म्हणून मिळाली लोकप्रियता
अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी १९८२ साली ‘स्वामी दादा’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिरो’ या चित्रपटातून जॅकी यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर देखणा रोमँटिक हिरो म्हणून त्यांचा चाहता वर्ग वाढला. ‘राम लखन’, ‘त्रिदेव’, ‘परिंदा’ आणि ‘खलनायक’ अशा अनेक चित्रपटांतून जॅकी यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र, अद्याप राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्याची खंत जॅकी श्रॉफ यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त
मनीष सैनी यांच्या ‘द ग्रेट ग्रँड सुपरहिरो’ चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफने प्रमुख भूमिका साकारली आहे. मनीष सैनीला आत्तापर्यंत तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. याबाबत जॅकी म्हणाले की, मनीषच्या नावावर तीन राष्ट्रीय पुरस्कार आहेत आणि माझ्या ४० हून अधिक वर्षांच्या कारकिर्दीत माझ्याकडे साधा एकही पुरस्कार नाही. मी राष्ट्रीय पुरस्कारांच्या जवळपासही कधी पोहोचलो नाही. पण मला घाई नाही, अशी प्रतिक्रिया जॅकी श्रॉफ यांनी दिली आहे.
