कलाकार अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलत असतात. ते कधी भेटले, त्यांच्या प्रेमाची कधी सुरुवात झाली, पहिल्यांदा प्रपोज कोणी केले, ते त्यांच्या जोडीदाराकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात या आणि अशा अनेक गोष्टींबद्दल कलाकार व्यक्त होतात.
अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानी आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हे लॉकडाऊनच्या दरम्यान प्रेमात पडले. २०२४ मध्ये त्यांनी गोव्यात लग्नगाठ बांधली. आता नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल, लग्नानंतर त्यांच्यात कसे नाते आहे याबद्दल सांगितले.
रकुल व जॅकीने नुकतीच झिंगाबाद या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत लग्नाचा निर्णय कसा घेतला याबद्दल जॅकी भगनानी म्हणाला, “आम्ही एकमेकांना म्हणालो की, आता आपण २०-२१ वर्षांचे नाही, आपण आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. वैयक्तिकरित्या, मी एक आनंदी व्यक्ती आहे. आयुष्यातील कुठली पोकळी भरून काढण्यासाठी मी कोणालाही शोधत नाही, कारण जर मी निराश व्यक्ती असेन, तर माझ्या आयुष्यात कोणीही आले तरी मी निराशच राहीन आणि वैयक्तिकरित्या तू सुद्धा आनंदी आहेस, आपण एकत्र आलो तर आपण जास्त आनंदी राहू.”
“मी आणि रकुलने जरी लग्न केले असले तरी…”
रकुल म्हणाली, “त्याने मला कुठे फिरायला नेलं नाही तर मी नाराज होत नाही, मी एकटीही जाऊ शकते. मला वाटतं की बोलण्यासाठी इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत.”
अलीकडे अनेकजण सिच्युएशनशिपमध्ये राहतात. त्याबद्दल जॅकी म्हणाला, “आताची तरुण पिढी सिच्युएशनशिपमध्ये राहण्याचा विचार करते, कारण त्यांना अपेक्षांचा दबाव नको असतो, कोणतीही बंधने नको असतात. मी आणि रकुलने जरी लग्न केले असले तरी आमचे नाते सिच्युएशनशिपसारखेच आहे. आम्ही एकमेकांशीच एकनिष्ठ आहोत, म्हणूनच आमचं लग्न झालं आहे. पण, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी तिच्याशी कोणत्याही विषयावर बोलू शकतो.”
जॅकी म्हणाला, “जर माझ्या एक्स गर्लफ्रेंडचा फोन आला आणि रकुल माझ्या शेजारी बसलेली असेल तर मी तो फोन स्पीकरवर ठेऊन तिच्याशी बोलू शकतो, कारण मी रकुलपासून काहीच लपवत नाही. कदाचित माझ्या एक्स गर्लफ्रेंडला थोडं अवघडल्यासारखं वाटेल, पण रकुलला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.” जॅकीच्या वक्तव्यावर रकुल म्हणाली, “आम्ही एकमेकांचे जवळचे मित्र आहोत.”
जॅकी असेही म्हणाला की, मी रकुलपासून काहीच लपवत नसल्यामुळे मला गुदमरल्यासारखे होत नाही. आम्हाला एकमेकांबरोबर वेळ घालवायला आवडते. एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी आम्ही उत्सुक असतो. अनेक चित्रपटांत असे दाखवतात की विरुद्ध स्वभाव असलेले लोक प्रेमात पडतात, एकमेकांकडे आकर्षित होतात; पण भविष्यात अशी नाती अयशस्वी होऊ शकतात. तुमचे विचार, नैतिकता, आवडीनिवडी जुळत नसतील तर तिथूनच मतभेद सुरू होतात.
