Jewel Thief Fame Actor on Ranbir Kapoor’s Ramayana Movie : लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘रामायण’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्यानं या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याबद्दलची माहिती नुकतीच दिली आहे. हा अभिनेता म्हणजे ‘महाराज’, ‘ज्वेल थीफ’ यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला जयदीप अहलावत.

जयदीप अहलावतनं त्याच्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या काही दिवसांत तो विविध कलाकृतींमधून झळकला. त्यामधून त्यानं वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यामुळे त्याचे चाहते आता त्याला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. जयदीपनं ‘लल्लनटॉप’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तो रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटात झळकणार होता. त्याबद्दलची माहिती त्यानं दिली आहे.

जयदीप म्हणाला, रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटात त्याला बिभीषण या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. तो ‘रामायण’ या चित्रपटातून झळकणार होता. परंतु, काही कारणांमुळे त्यानं या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. जयदीप ‘रामायण’ चित्रपटातील भूमिका न करण्यामागचं कारण सांगत म्हणाला, “बिभीषण हा रावणाचा धाकटा भाऊ आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना असा कोणीतरी अभिनेता हवा होता, जो ‘केजीएफ’फेम अभिनेता यशबरोबरच्या चित्रीकरणाच्या तारखांनुसार काम करू शकेल. कारण- यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे हे दोघे भाऊ असल्यानं आमचे बरेच सीन एकत्र होणार. त्याकरिता आमच्या दोघांच्या तारखा जुळणं महत्त्वाचं आहे. आणि मला माहीत आहे की, यशच्या तारखा त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत”.

‘रामायण’ या आागामी चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करीत आहेत. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. २०२४ साली या चित्रपटाची घोषणा झाली होती. ‘रामायण’मध्ये लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूर व दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी श्रीराम व सीता यांच्या भूमिका साकारणार आहेत. तर, अभिनेता सनी देओल यामध्ये हनुमानाची भूमिका साकारणार आहे. ‘केजीएफ’फेम अभिनेता यश या चित्रपटातून रावणाच्या भूमिकेतून झळकणार आहे. तर, मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे यामध्ये श्रीरामाच्या भावाची भरतची भूमिका साकारणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जयदीप अहलावतबद्दल बोलायचं झालं, तर सध्या अभिनेता ओटीटीवरून वेगवेगळ्या वेब सीरिज, चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच त्याचा ‘ज्वेल थीफ’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये अभिनेता सैफ अली खान व तो महत्त्वाच्या भूमिकांत झळकले होते. यापूर्वी त्यानं ‘पाताल लोक’, ‘महाराज’ यांसारख्या अनेक कलाकृतींमधून काम केलं आहे. लवकरच तो शाहरुख खानच्या ‘किंग’ या आगामी चित्रपटातून झळकणार आहे.