करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोच्या नवीन भागात वरुण धवन आणि जान्हवी कपूरने हजेरी लावली. यावेळी करणने जान्हवीला ‘पेड्डी’ चित्रपटातील वादाबद्दल विचारलं. तसेच ज्या पद्धतीने सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सामना केला त्यासाठी कौतुक केलं. जान्हवीने पहिल्यांदाच या वादावर भाष्य केलंय. वेळीच विरोध केला नाही, या गोष्टीची आयुष्यभर लाज वाटत राहील, असं ती म्हणाली.

करण म्हणाला, “सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सामना करण्यासाठी मानसिक ताकदीची गरज असते. जान्हवी कपूर आकर्षक आहे हे सर्वांनाच माहीत आहे, पण आकर्षक असणं आणि तिचं आक्षेपार्ह, अश्लील उदात्तीकरण करणं यात फरक आहे. पेड्डी वादाच्या वेळी नेमकं काय घडलं होतं? मला माहीत आहे की याचा तुझ्यावर खूप खोल परिणाम झाला होता.” यावर जान्हवी म्हणाली, “त्या संपूर्ण प्रसंगात तू माझ्याबरोबर होतास आणि मला मार्गदर्शन केलंस.”

चूक स्वीकारणं जास्त महत्त्वाचं – जान्हवी कपूर

करण पुढे म्हणाला, “यासंदर्भात लोकांचे दोन गट पडले होते. एका गटाला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटत होती. तर दुसऱ्या गटाचं म्हणणं होतं की, ‘ती सेटवर होती, मग तिने हे सगळं थांबवलं का नाही?’ तुला याबद्दल काय वाटतं?” यावर उत्तर देत जान्हवी म्हणाली, “मला बरंच काही वाटत होतं. यावर बोलण्यास मी घाबरत होते, कारण अनेक लोकांनी त्या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. नक्की काय बोलावं हे मला समजत नव्हते. पण या संपूर्ण गोंधळात माझ्याकडून झालेली चूक स्वीकारणं मला महत्त्वाचं वाटतं. कारण अशा नकारात्मक गोष्टींचा आणि विचारांचा आपल्या समाजात खासकरून महिलांवर खूप वाईट परिणाम होतो.”

मला या गोष्टीची आयुष्यभर लाज वाटेल – जान्हवी कपूर

जान्हवी ती म्हणाली, “मला आयुष्यभर ती लाज वाटत राहील. मी आणखी सतर्क राहायला हवं होतं का? मी विरोध करून वाद घालायला हवा होता का? तर १०० टक्के हो! ते दृश्य आक्षेपार्ह होते का? त्यात माझं अत्यंत आक्षेपार्ह सादरीकरण झालं होतं का? तर नक्कीच हो. भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेणं एवढंच मी करू शकते. मी स्वतःलाच खूप दोष दिला की मी अधिक काळजी घ्यायला हवी होती. मला कोणावरही दोष ढकलायचा नाहीये, पण चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक जे सांगेल ते ऐकावं लागतं असं वातावरण असतं. दक्षिणेत बऱ्याचदा पूर्ण स्क्रिप्ट आधी देत नाहीत किंवा कॅमेऱ्याचे अँगल कुठे असतील हे लिहिलेलं नसतं. तरीही माझ्याकडून झालेल्या चुकीची जबाबदारी मी घेते. मी त्याविरोधात ठामपणे बोलायला हवं होतं.”

करणने विचारलं, “तुला दिग्दर्शकाने हे सगळं हेतुपुरस्सर केलं नव्हतं असं वाटतं का?” यावर उत्तर देताना जान्हवी म्हणाली, “मला स्वतःला इथे बळी म्हणून दाखवायचं नाहीये, पण तो अनुभव माझ्यासाठी अत्यंत त्रासदायक आणि अपमानास्पद होता.”

जान्हवी शेवटी म्हणाली, “या सगळ्यात एकच चांगली गोष्ट घडली, ती म्हणजे भविष्यात कोणत्याही मुख्य अभिनेत्रीला अशा प्रकारे पडद्यावर दाखवण्यापूर्वी लोक शंभरदा विचार करतील. उद्या जर एखादी अभिनेत्री म्हणाली की ‘मी या सीनमध्ये कम्फर्टेबल नाही’, तर तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं जाणार नाही.”