जान्हवी कपूरने ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात ती शिखर पाहारियाला डेट करत असल्याचं मान्य केलं आणि लग्नाबद्दलच्या नियोजनाबद्दलही सांगितलं. तिने यावेळी इतके दिवस याबद्दल कधीच अधिकृतपणे का काही बोलली नाही यामागचं कारणही सांगितलं आहे.

‘कॉफी विथ करण’च्या अलीकडील भागात करण जोहरने जान्हवी कपूरला ती शिखर पहारियाला डेट करत आहे का, असा प्रश्न विचारला. यावर जान्हवीने होकार दिला. ती म्हणाली, “सगळे याबाबतीत इतके गंभीर का असतात, असा विचार मी नेहमी करायचे. अर्थात, मला कोणाची नजर लागू नये असं वाटतं. माझ्या खासगी आयुष्यात काय सुरू आहे, याबद्दलही मला खूप उघडपणे बोलायचं नाही. पण कोणालाच काही कळू द्यायचं नाही, असं वागणं मला उगाचच अवाजवी वाटतं. त्यामुळे या गोष्टीबद्दल लपवाछपवी करणं कंटाळवाणं आहे आणि ही काही फार मोठी गोष्ट नाही.” करण जोहरने जान्हवीला लग्नाबद्दलही विचारलं. यावर उत्तर देताना ती म्हणाली, “पुढची दोन-तीन वर्षे तरी नक्कीच नाही.” आजूबाजूला अनेकांचं ब्रेकअप होत असतानाही त्यांचे मात्र एकमेकांशी चांगले संबध आहेत आणि त्यांचं छान सुरू आहे, असंही तिने सांगितलं.

शिखर व जान्हवी एकत्र (फोटो – इन्स्टाग्राम)

या संवादादरम्यान जान्हवीने श्रीदेवी यांच्या निधनानंतर शिखर पहारियाने तिला कसा आधार दिला, याबद्दलही भाष्य केलं आहे. त्यावेळी दोघेही रिलेशनशिपमध्ये नव्हते. शिखर लंडनमध्ये शिकत होता. मात्र, सेमिस्टर अर्धवट सोडून तो जान्हवीबरोबर राहण्यासाठी मुंबईत परतला होता.
जान्हवीने सांगितलं की, शिखर स्वतःच्या घरी राहण्याऐवजी जुहूमध्ये एका मित्राकडे राहत होता, जेणेकरून जेव्हा तिला त्याची गरज असेल, तेव्हा तो तिच्यासाठी उपलब्ध असू शकेल.

जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतात. यापूर्वी एका मुलाखतीत जान्हवीने सांगितलं होतं की, ती १५-१६ वर्षांची असल्यापासून शिखर तिच्या आयुष्याचा भाग आहे. दोघेही एकमेकांसाठी आधार असल्याचंही तिने म्हटलं होतं. या दोघांच्या नात्याची अनेकदा चर्चा होते. कौटुंबिक समारंभ, मंदिरात दर्शन घेण्यासाठी किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हे दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत.

दरम्यान, शिखर पाहारियाबद्दल बोलायचं झालं तर शिखर पहारिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा तो मुलगा आहे. संजय पहारिया हे व्यावसायिक असून स्मृती शिंदे या मालिकांची निर्मिती करतात. शिखरला वीर नावाचा भाऊ आहे. वीरने ‘स्कायफोर्स’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. शिखर मात्र चित्रपटांपासून दूर असल्याचं पाहायला मिळतो.