Janhvi Kapoor Talks About Her Late Mother Sridevi : बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा मोकळेपणानं तिची मत व प्रतिक्रिया व्यक्त करत असते. अशातच अभिनेत्रीने तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी तिने तिच्या आयुष्यातील काही खडतर प्रसंग सांगितले आहेत.
श्रीदेवी बॉलीवूड व दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांत विविध भूमिका साकारत आणि लोकप्रिय अभिनेत्यांसह काम करत त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात जणू कायमचं घर केलं होतं. मनोरंजन विश्वात त्यांचं मोठं नाव होतं. परंतु, २०१८ मध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या दोन्ही मुली आणि पती बोनी कपूर यांच्यावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. आईवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या जान्हवी कपूर व खूशी कपूर यांना आईच्या अचानक झालेल्या निधनामुळे कठीण परिस्थितीतून जावं लागलं. जान्हवीने याबद्दल ‘राज शमानी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. परंतु, याचवेळी तिने लोक तिच्या आईचं कौतुक जरी करत असले तरीसुद्धा अनेकदा तिच्या आईबद्दल नकारात्मक गोष्टी बोलायचे तिला घर तोडणारी स्त्री असं म्हणायचे असं सांगितलं आहे.
लोक तिला घर तोडणारी म्हणायचे – जान्हवी कपूर
मुलाखतीत जान्हवी म्हणाली, “आईने फक्त मला आणि खुशीलाच नाही तर बाबांनासुद्धा घडवलं आहे. तिने आम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या त्यामुळेच तिच्या जाण्याने मी फक्त माझ्या आईला गमावलं नाही तर माझे दोन्ही पालक गमावले. कारण ती माझ्यासाठी आई आणि वडील दोन्ही होती. पण, लोक तिला घर तोडणारी स्त्री आणि इतर बऱ्याच नको नको त्या गोष्टी बोलायचे ज्यामुळे तिला खूप वाईट वाटायचं. पण, सुदैवानं इतिहासात जग सोडून गेलेल्या लोकांबद्दल चांगलं बोलले जातं”.
आई श्रीदेवीबरोबरच्या नात्याबद्दल जान्हवी पुढे म्हणाली, “काय खायचं, कोणते कपडे घालायचे, काय करायचं, काय नाही करायचं या सगळ्यासाठी मी आईवर अवलंबून होते. त्यामुळे ती गेल्यानंतर मला स्वतःला उभं करणं खूप कठीण गेलं. मी काही चुकीचे निर्णय घेतले आणि माझ्याशी काही संबंध नसलेल्या लोकांना माझ्या आयुष्यात येऊ दिलं आणि त्यांनी माझा खूप फायदा घेतला. मी स्वतःला सुरक्षित ठेवत नव्हते. मी स्वतःच्या सुरक्षेशी तडजोड करत होते.”
जान्हवी कपूरने या मुलाखतीत या सगळ्या दरम्यान तिला तिच्या प्रेमाची खूप साथ मिळाली आणि त्यामुळे तिला खूप सुरक्षित वाटलं. तिच्या प्रियकराबरोबर असताना तिला नेहमी आनंद वाटतो आणि त्याच्याबरोबर ती अगदी लहान मुलासारखी राहते असं तिने यामधून म्हटलं आहे.
