Janhvi Kapoor’s Shares Struggle With Depression : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने अत्यंत कठीण परिस्थितीत चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. तिचा पहिला चित्रपट ‘धडक’ प्रदर्शित होण्याच्या काही महिने आधीच ज्येष्ठ अभिनेत्री असलेली तिची आई श्रीदेवी यांचे निधन झाले होते. जान्हवीने आता एका मुलाखतीत खुलासा केला की, पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ती नैराश्यात (डिप्रेशनमध्ये) गेली होती, कारण- तिला असे वाटायचे की, लोक तिचा तिरस्कार करतात.

जान्हवी कपूर नुकतीच राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले. तसेच तिने इंडस्ट्रीतील पदार्पणाच्या आठवणींनादेखील उजाळा दिला. जान्हवीने २०१८ मध्ये ‘धडक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

‘धडक’नंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते – जान्हवी कपूर

पदार्पणाच्या चित्रपटाबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली, “माझ्या पहिल्या चित्रपटाबद्दल लोक सांगतात की, तू त्यात खूप छान काम केलं होतंस किंवा आम्हाला ‘धडक’ आवडला. माझ्यासाठी त्या चित्रपटाच्या आठवणी खूप वेगळ्या आहेत. ‘धडक’नंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मला वाटलं होतं की, आता सगळं संपलंय, लोक माझा तिरस्कार करतात.”

Award Banner

“मला आईकडूनच प्रोत्साहन मिळायचं, ती गेल्यानंतर…”

ती पुढे म्हणाली, “मला नेहमी माझ्या आईकडूनच प्रोत्साहन मिळायचं. ती गेल्यानंतर मी विचार केला की, आता प्रेक्षकच मला ते प्रोत्साहन देतील. मला वाटलं होतं की, सर्व जण माझा स्वीकार करतील. पण मला हे माहीत नव्हतं की, असं कधीच घडत नाही. मी फक्त नकारात्मक गोष्टींवर लक्ष देत होते. हा चित्रपट ‘सैराट’नंतर नवोदित कलाकारांचा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला होता; पण तो हिट झालाय हे माझ्या लक्षातच आलं नाही. मला फक्त एवढंच वाटत होतं की, मी चांगलं काम केलं नाहीये आणि लोक माझ्यावर नाराज आहेत. कारण- मी फक्त नकारात्मक गोष्टीच पाहत होते.”

“मला भासवलं गेलं की, मला सगळं सहज मिळालंय”

याआधीही एका मुलाखतीत जान्हवीनं सांगितलं होतं की, ‘धडक’ आणि ‘गुंजन सक्सेना’दरम्यान तिला अनेकदा तिला याची जाणीव करून देण्यात आली की, तिला सगळं सहज मिळालं आहे आणि ती त्यासाठी पात्र नाही. ‘B4U’च्या एका पॉडकास्टमध्ये ती म्हणाली होती, ” ‘धडक’ आणि ‘गुंजन सक्सेना’च्या वेळी मला असं भासवलं गेलं की, मला सगळं सहज मिळालं आहे. मला अशा गोष्टी मिळाल्या आहेत, ज्यासाठी मी अजिबातच पात्र नाही. याचा अर्थ असा होतो की, मला माझ्या पालकांच्या कामामुळे मला संधी मिळत आहे. त्यावेळी मला माझ्या पालकांबद्दल खूप आदर आणि प्रेमही वाटत होतं. कारण- त्यांच्यामुळेच मला काम मिळत होतं. पण वास्तव हे आहे की, मलाही अभिनयाची आवड आहे आणि मी त्यासाठीच जगते.”

जान्हवी कपूरचा बॉलीवूडमधील प्रवास

शशांक खेतान दिग्दर्शित आणि करण जोहरची निर्मिती असलेला ‘धडक’ हा चित्रपट २०१६ च्या गाजलेल्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटाचा रिमेक होता. त्यानंतर जान्हवीने ‘गुंजन सक्सेना’, ‘घोस्ट स्टोरीज’, ‘रुही’ व ‘गुड लक जेरी’ यांसारख्या विविध चित्रपटांमध्ये काम केले.

अलीकडेच ती ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये वरुण धवन, सान्या मल्होत्रा व रोहित सराफ यांच्याही भूमिका होत्या.

त्यानंतर आता जान्हवी आगामी काळात दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणबरोबर ‘पेड्डी’ या तेलुगू चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येईल.