Janhvi Kapoor share Sridevi memories : तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री जान्हवी कपूर ही लवकरच नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘पेड्डी’ हा तिचा दाक्षिणात्य चित्रपट येत्या ४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यासाठी जान्हवी जोरदार प्रमोशन करत असून चर्चेमध्ये आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जान्हवी कपूरने तिची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या आठवणी सांगितल्या आहेत. अभिनेत्री श्रीदेवीने यशाच्या शिखरावर असताना करिअर सोडण्याचा घेतलेला धाडसी निर्णय आणि कुटुंबाला दिलेला वेळ याबाबत जान्हवी कपूरने सांगितले आहे. तसेच आजही रोज आईची आठवण येत असल्याचे जान्हवीने सांगितले.

अभिनेत्री जान्हवी कपूरने ‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आई श्रीदेवीच्या आठवणी सांगितल्या. जान्हवी म्हणाली की, आई मोठी अभिनेत्री आहे हे माहीत होते पण तिची लोकप्रियता आणि स्टारडम एवढे मोठे आहे हे त्यावेळी समजत नव्हते. तिने चार वर्षांची असल्यापासून बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. स्वभावाने अत्यंत लाजाळू असलेल्या आईने मेहनतीने यश मिळवले. पण तिने आमच्यासाठी कुटुंबाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. यावेळी ती कुटुंबामध्ये आणि संसारामध्ये पूर्णपणे रमली होती. तिचा स्वभावच असा होता की, ते जे काही काम करत असे, ते अगदी मनापासून आणि पूर्ण झोकून देऊन करत असे. माझ्या आईमधील ही गोष्ट मला नेहमीच आवडते, असे अभिनेत्री जान्हवी कपूरने म्हटले आहे.

आईने कुटुंबासाठी प्रोफेशन मागे सोडले – जान्हवी

पुढे जान्हवी कपूर म्हणाली की, आईने मनापासून आमच्या सर्वांचा आणि कुटुंबाचा सांभाळ केला. कुटुंबासाठीही तिने प्रोफेशन मागे ठेवून स्वतःला पूर्णपणे आई आणि पत्नीच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतवून घेतले. मोठे होईपर्यंत मला आईचा हाच साधा आणि प्रेमळ स्वभाव पाहायला मिळाला. नंतर आम्ही मोठे झाल्यावर तिने पुन्हा अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले. आईने मला सांगितले होते की, तुम्ही कॅमेऱ्यासमोर खोटे बोलू शकत नाही. चांगली अभिनेत्री होण्यासाठी आधी चांगली व्यक्ती होणे गरजेचे असते. तेव्हाच ते प्रेक्षकांना आवडते, असे आई सांगत असल्याचे जान्हवी कपूरने सांगितले आहे.

आईचा वारसा पुढे नेणे खूप कठीण – जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूरची तुलना अनेकदा तिची आई श्रीदेवीशी केली जाते. याबाबत तिला विचारल्यावर जान्हवी म्हणाली की, श्रीदेवींसारखी दुसरी अभिनेत्री कोणीही होऊ शकत नाही आणि भविष्यातही होणार नाही. माझ्याकडून आईसारख्या अभिनयाची अपेक्षा करत नाहीत, फक्त मी आईचा अभिनयाचा वारसा पुढे घेऊन जावा, अशी अपेक्षा असते. आईचा वारसा पूर्णपणे पुढे नेणं हे खूप मोठं आणि कठीण काम आहे. पण मी त्याचा सन्मान राखण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. मला बॉलीवूडमध्ये मिळणाऱ्या प्रत्येक संधीसाठी मी कृतज्ञ आणि आनंदी असते. आणि कामामधून आईच्या आठवणी कायम ताज्या राहतात, असे मत अभिनेत्री जान्हवी कपूरने व्यक्त केले आहे.

तिरुपतीच्या दर्शनाने मनशांती मिळते

पुढे जान्हवीने सांगितले की, जेव्हा पण मी कॅमेऱ्यासमोर असते आणि जेव्हा मी तिरुपतीला जाते, तेव्हा मला आईच्या जवळ असल्यासारखे वाटते. त्यामुळेच अभिनय माझ्यासाठी खूप खास आहे आणि वारंवार तिरुपतीला जात असते. तिथे मला मनशांती मिळते. त्या क्षणी मला स्वतःशी आणि आईशी एक वेगळेच नाते जोडलेले वाटते. आजही असे वाटते की आई एखाद्या ट्रीपवर गेली आहे आणि लवकरच घरी परतणार आहे. हे दुःख कधीच कमी होणार नाही, अशा शब्दात अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या आईबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.