Janhvi Kapoor Tirupati Darshan : अभिनेत्री जान्हवी कपूर हिची तिरुपती बालाजीवर असणारी श्रद्धा सर्वांनाच माहिती आहे. वाढदिवस असो वा कोणतेही महत्त्वाचे काम, जान्हवी ही व्यंकटेशाचे आवर्जून दर्शन घेत असते. अनेकदा ती कुटुंबासह किंवा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासह दर्शनासाठी येत असते. अभिनेत्री जान्हवी पुन्हा तिरुपतीमध्ये दाखल झाली असून यावेळी तिने पायी पायऱ्या चढत दर्शन घेतले आहे. दरम्यान, जान्हवीचा दाक्षिणात्य चित्रपट ‘पेड्डी’ नुकताच रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर जान्हवीने तिरुपतीत जाऊन दर्शन घेतले आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर ही अनेकदा बालाजीच्या दर्शनाला जात असते. कोणतीही व्हीआयपी सुविधा न वापरता ती सामान्य भक्तांप्रमाणे दर्शन घेत असते. यावेळी तिने पायी पायऱ्या चढून तिरुपतीचे दर्शन घेतले. यावेळी ती अगदी साध्या कपड्यांमध्ये दिसून आली. गुलाबी रंगाचा कॉटनचा ड्रेस जान्हवीने परिधान केला होता. तिरुमला टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या अलीपिरी येथून जान्हवीने मंदिराच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. पहिल्या पायरीवर नारळ फोडून श्रद्धेने तिने हा पायी प्रवास सुरू केला. अलीपिरीपासून तिरुमला मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे ३५०० हून अधिक पायऱ्या आहेत. जान्हवी अनेकदा भक्तीभावाने अलीपिरी ते तिरुपती असा पायी प्रवास करताना दिसून येते.

खास साऊथ इंडियन लूक चर्चेत

सोशल मीडियावर जान्हवीचे तिरुपतीमधील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अनवाणी चालल्यानंतर जान्हवी अगदी सामान्य मुलीसारखी पायऱ्यांवर बसून राहिली होती. दर्शनावेळी तिच्यासह तिची टीम आणि मैत्रीण बरोबर असल्याचे दिसून येत आहे. तिरुपती दर्शनावेळी जान्हवी कपूरचा साधेपणा आणि भक्तीभाव नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवीने तिरुपतीचे दर्शन घेतले. जांभळ्या रंगाच्या डिझायनर साडीमध्ये तिने साऊथ इंडियन लूक केला होता. यासह हेव्ही नेकलेस, बांगड्या आणि कंबरपट्टा अशी ‘टेम्पल ज्वेलरी’ लक्षवेधी ठरत होती. तिचा साधा मेकअप आणि देसी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

तिरुपतीच्या दर्शनाने आईजवळ असल्यासारखे वाटते – जान्हवी

अभिनेत्री जान्हवी कपूर हिने नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिला बालाजीच्या दर्शनाने शांती मिळत असल्याचे सांगितले होते. अभिनेत्री श्रीदेवी यांचीदेखील तिरुपती बालाजीवर अमाप श्रद्धा होती. यानंतर हीच आस्था जान्हवीमध्ये असल्याचे दिसून येते. तिरुपतीला आल्यानंतर आईच्या (श्रीदेवी) जास्त जवळ असल्यासारखे वाटते, असे अभिनेत्री जान्हवी कपूरने नमूद केले होते.

जान्हवीचा ‘पेड्डी’ चित्रपट रिलीज

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता राम चरण यांचा बहुचर्चित ‘पेड्डी’ चित्रपट रिलीज झाला आहे. या दाक्षिणात्य चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील जान्हवी कपूरचा अभिनय आणि खास लूक प्रेक्षकांना भावला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवीने जोरदार प्रयत्न केले असून हा तिचा दुसरा टॉलीवूड चित्रपट असणार आहे.