बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमुळे चर्चेत आहे. यंदाच्या ७८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला जान्हवी कपूरने पहिल्यांदा हजेरी लावली. तिच्या कान्समधील पदार्पणाने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. जान्हवी कपूर कान्समध्ये तिच्या ‘होमबाऊंड’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली आहे. यावेळी तिने केलेल्या लूकमुळे तिचं अनेकांनी कौतुक केलं आहे. तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियाच्या आई स्मृती शिंदेंनेही तिचं कौतुक केलं आहे.
स्मृती शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत जान्हवीचा फोटो शेअर केला आहे. यावर त्यांनी “कान्स फिल्म फेस्टिव्हल येथील तुझ्या पदार्पणासाठी तुझं अभिनंदन जानू, अजून खूप चांगली कामं करायची आहेत. अशीच प्रगती करत राहा.” असं म्हटलं आहे. कान्स येथील जान्हवीच्या लूकची सोशल मीडियावरही बरीच चर्चा रंगली आहे.
जान्हवी कपूरने ‘व्होग इंडिया’शी संवाद साधताना म्हटलं की, ”कान्स माझ्या आईची आवडती जागा होती. येथे आम्ही ३-४ वेळा येऊन गेलो आहोत. यंदा मी माझे बाबा आणि बहिणीबरोबर पुन्हा एकदा कान्सला आलेय. पण यावेळी आमच्याबरोबर आई नाहीये. आईशिवाय इकडे येणं खूप कठीण होतं कारण तिने आजवर मला तिच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्त्वाच्या प्रसंगात सामील केलेलं होतं.”
नीरज घायवान दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित ‘होमबाऊंड’ चित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उपस्थित लोकांनी उभं राहून दाद दिली. यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर यावेळी दिग्दर्शक नीरज घायवान, करण जोहर, जान्हवी कपूर व इशान खट्टर भावुक होताना दिसले. ‘होमबाऊंड’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण अद्याप हा चित्रपट कोणत्या तारखेला प्रदर्शित होणार आहे याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
दरम्यान, जान्हवी कपूरच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर ती तुषार जलोटा दिग्दर्शित ‘परमसुंदरी’ या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये तिच्यासह अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट २५ जुलैला २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. यासह ती अजून एका चित्रपटातून झळकणार आहे. शशांक खेतान दिग्दर्शित ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १२ सप्टेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.