Jasmine Sandlas Alcohol Addiction: दारूच्या आहारी जाऊन अनेक जण त्यांच्या आरोग्याचे नुकसान करतात. त्या व्यक्तीच्या दारूच्या व्यसनाचा दुष्परिणाम त्याच्यावर होतो, तितकाच परिणाम त्याच्या आजूबाजूच्या माणसांवरही होतो. इतकेच नाही, तर व्यक्तीच्या करिअरवरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. दारूचे व्यसन सोडण्यासाठी अनेक जण अनेक तऱ्हेचे प्रयत्न करतात.
अनेक बॉलीवूड कलाकारांनी त्यांच्या दारूच्या व्यसनाबद्दल मुलाखतींमध्ये खुलेपणाने सांगितले आहे. तसेच, सहकलाकारांच्या व्यसनाबद्दलही अनेक जण बोलताना दिसतात. त्यामध्ये राजेश खन्ना, जावेद अख्तर, मनीषा कोईराला, अजय देवगण, बॉबी देओल असे अनेक कलाकार आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सिगारेट ओढण्याच्या सवयीबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते. आता एका लोकप्रिय गायिकेने तिच्या दारूच्या व्यसनाबद्दल वक्तव्य केले आहे.
गायिका जास्मिन सँडलास सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे धुरंधर द रिव्हेंज या ब्लॉकबस्टर सिनेमातील तिने गायलेली गाणी गाजत आहेत. शाश्वत सचदेवने ही गाणी संगीतबद्ध केली आहेत.
जास्मिनने नुकतीच रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्या मुलाखतीत तिने तिच्या करिअरबद्दल सांगितले. तसेच, तिच्या दारूच्या व्यसनाबद्दलही वक्तव्य केले. ती म्हणाली, “मी खूप संघर्ष केला आहे. मी मोठी होताना अनेक गोष्टी घडल्या. तो संघर्ष फक्त पालकांचा नसतो, तो त्यांच्या मुलांचाही असतो. अनेकदा आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते, प्रेमाची गरज असते. पालक त्यांच्या मुलांबरोबर कठोरपणे का वागतात? जेव्हा तुम्ही कठीण काळाचा सामना करत असता, त्यावेळी तुम्हाला पाठिंब्याची गरज असते.”
“त्याचा मला पश्चात्ताप…”
दारूच्या व्यसनाबद्दल जास्मिन म्हणाली, “जेव्हा मला दारूचे व्यसन लागले होते, त्या दोन-तीन वर्षांत मी काही गोष्टी केल्या, त्याचा मला पश्चात्ताप आहे. खूप गोष्टी एकत्र घडत होत्या. एका बाजूला मी लोकप्रिय ठरत होते. दुसऱ्या बाजूला माझ्या कुटुंबात वाईट गोष्टी घडत होत्या. माझ्या वडिलांचे निधन झाले. त्याच वेळी मला यशही मिळत होते. मी जितक्या प्रमाणात दारू प्यायला पाहिजे होती, त्यापेक्षा जास्त दारू प्यायले. मला त्याचा पश्चात्ताप आहे. मात्र, मला असे वाटते की, त्यावेळी माझ्यासाठी ते गरजेचे होते.”
जास्मिन पालकांबद्दल म्हणाली, “त्यांनी नकळत अनेक वेळा माझं मन दुखावलं. त्यामुळे माझ्या मनात राग आहे. माझं त्यांच्यावर प्रेम आहे. पण, जेव्हा एखाद्या लहान मुलाचं मन तुटतं, तेव्हा ते तसंच राहतं. जेव्हा तुमच्याकडे सुरक्षित वाटेल असं ठिकाण नसतं, तेव्हा तुम्ही वेड्यासारखं प्रत्येक गोष्टीत घर शोधू लागता. मी आयुष्यभर फक्त घर शोधत राहिले.”
जास्मिनने २००८ मध्ये मुस्कान या गाण्यापासून तिच्या करिअरला सुरुवात केली. २०१४ ला तिला किक या चित्रपटातील गाण्यांमधून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
