Boney Kapoor, Sridevi and Mona Kapoor Love Triangle: बॉलीवूडमधील सर्वात गाजलेल्या प्रेमप्रकरणांपैकी एक म्हणजे बोनी कपूर आणि श्रीदेवी यांचं नातं. मात्र, हे नातं फुलत असताना बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीवर, म्हणजेच मोना कपूर यांच्यावर काय प्रसंग ओढवला होता, याचा एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ज्येष्ठ गायिका जसपिंदर नरुला यांनी ‘जुदाई’ चित्रपटातील गाण्याच्या रेकॉर्डिंगचा तो अनुभव शेअर केला आहे. “मी स्टुडिओत गाणं गात होते आणि मोना बाहेर पायऱ्यांवर बसून रडत होती,” असं म्हणत जसपिंदर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

‘जुदाई’ चित्रपट १९९६ साली आला होता. या चित्रपटातील ‘मुझे एक पल चैन ना आए’ हे गाणं ज्येष्ठ गायिका जसपिंदर नरुला यांनी गायलं होतं. ‘बॉलीवूड ठिकाणा’शी बोलताना जसपिंदर यांनी त्यांच्या पहिल्या बॉलीवूड गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या आठवणींना उजाळा दिला. ‘जुदाई’ चित्रपटात श्रीदेवी, अनिल कपूर आणि उर्मिला मातोंडकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. “मला सांगण्यात आलं होतं की हे गाणं श्रीदेवीवर चित्रित होणार आहे. त्यांनी मला चित्रपटातील परिस्थिती समजावून सांगितली होती की कशा प्रकारे पैशांच्या बदल्यात श्रीदेवी अनिल कपूर यांचे दुसरे लग्न लावून देते.”

जसपिंदर यांनी सांगितलं की त्या वेळी त्यांना कानाचा गंभीर त्रास होत असूनही त्यांनी हे गाणे रेकॉर्ड केलं होतं. “माझ्या कानात कफ साचला होता आणि माझा एक कान पूर्णपणे बंद झाला होता. अत्यंत त्रास होत असूनही मी ते गाणं गायलं.” श्रीदेवीची आठवण त्यांनी सांगितली. “मी श्रीदेवी यांना दोन-तीन वेळा भेटले होते.”

मोना कपूर जसपिंदर यांना काय म्हणाल्या होत्या?

बऱ्याच वर्षांनंतर जसपिंदर नरुला आणि मोना कपूर चांगल्या मैत्रिणी झाल्या. तेव्हा जसपिंदर यांना ते गाणं आणि त्याचं बोनी, श्रीदेवी व मोना यांच्या खऱ्या आयुष्यातील नात्यातील गुंतागुंत याचं कनेक्शन समजलं. खुद्द मोना यांनी त्या गाण्यावेळची परिस्थिती जसपिंदर यांना सांगितली होती.

जसपिंदर म्हणाल्या, “मी मोना कपूरच्या खूप जवळ होते. गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू असताना नेमकं काय घडत होतं, हे तिने मला नंतर सांगितलं. तेव्हा एक संसार सुरू होत होता, तर दुसरीचा संसार उद्ध्वस्त होत होता.” पुढे जसपिंद यांनी मोना काय म्हणाल्या ते सांगितलं. “मोना मला म्हणाली की, ‘तू आत स्टुडिओमध्ये गाणे गात होतीस आणि मी बाहेर ‘सुपर साऊंड’ स्टुडिओच्या पायऱ्यांवर बसून रडत होते.’ त्याचवेळी तिला सगळं समजलं होतं आणि ही गोष्ट तिने माझ्याशी शेअर केली होती.”

बोनी कपूर यांनी श्रीदेवीबद्दल पहिल्या पत्नीला सगळं सांगितलेलं

श्रीदेवीबरोबरच्या आपल्या नात्याबद्दल पहिली पत्नी मोना कपूरला सगळं सांगितलं होतं, असा खुलासा बोनी कपूर यांनी चंदा कोचर यांच्याशी बोलताना केला होता. मोना कपूरचे २०१२ मध्ये निधन झाले. तिला व बोनी कपूर यांना अभिनेता अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही दोन अपत्ये आहेत.

आपल्या बोटातील अंगठी दाखवत बोनी कपूर म्हणालेले, “मी माझ्या पहिल्या पत्नीला सर्व काही मोकळेपणाने सांगितलं होतं. मी सध्या जी अंगठी घातली आहे आणि जी अंगठी श्रीदेवी घालायची, त्या दोन्ही अंगठ्या मोनानेच विकत घेतल्या होत्या. मी तिच्याशी याबाबत स्पष्टपणे बोललो होतो, आणि म्हणूनच तिने माझ्याबद्दल किंवा माझ्या मुलांबद्दल मनात कोणतीही अढी न ठेवता मुलांना वाढवलं.”

जेव्हा बोनी कपूर यांनी श्रीदेवीला प्रपोज केलेलं

‘एबीपी लाईव्ह’ला दिलेल्या दुसऱ्या एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी श्रीदेवींना पहिल्यांदा प्रपोज केल्याचा किस्सा सांगितला. बोनी कपूर विवाहित असल्याने सुरुवातीला श्रीदेवी त्यांच्यापासून लांब राहायच्या.

“माझं तिच्यावर प्रेम होतं, आजही आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील. तिला पटवायला मला ४-६ वर्षे लागली. जेव्हा मी पहिल्यांदा तिला प्रपोज केलेलं, तेव्हा ती माझ्याशी सहा महिने बोलली नव्हती. ती म्हणाली होती, ‘तुमचे लग्न झाले आहे, तुम्हाला दोन मुलं आहेत, तुम्ही माझ्याशी असं कसं बोलू शकता?’ पण मी माझ्या मनातील गोष्ट बोलून दाखवली आणि नशिबाने मला साथ दिली.”

बोनी कपूर आणि श्रीदेवी १९९६ मध्ये लग्न केलं. त्यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत.