Javed Akhtar Talk About Border 2 Songs : टी-सीरिजने ‘बॉर्डर’मधील ‘संदेसे आते हैं’चं रिमेक ‘घर कब आओगे’ लाँच केलं, तेव्हा गाण्याच्या क्रेडिट लिस्टमध्ये गीतकार जावेद अख्तर यांचे नाव दिले गेले. मनोज मुंताशीर यांनी या गाण्यासाठी काही नवीन ओळी लिहिल्या होत्या. पण, यात जुन्या गीतकाराच्या काही ओळीसुद्धा आहेत. जुन्या गाण्यातील काही ओळी आणि त्यात नवीन शब्द लिहून ‘बॉर्डर २’मधील ‘घर कब आओगे’ हे गाणं तयार केलं गेलं आहे.
यावर आता जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, ‘बॉर्डर २’मधील ‘घर कब आओगे’ आणि ‘जात हुए लम्हो’ यांसारख्या गाण्यांसाठी टी-सीरिज आणि जे. पी. फिल्म्सच्या निर्मात्यांनी त्यांना काही नव्या ओळी लिहिण्यासाठी विचारलं होतं. मात्र, जावेद अख्तर यांनी यासाठी नकार दिला, कारण त्यांना वाटतं की आधीच लोकप्रिय असलेल्या गाण्यांमध्ये नवीन ओळी लिहिणं ही ‘बौद्धिक दिवाळखोरी’ आहे.
याबद्दल जावेद अख्तर यांनी ‘इंडिया टूडे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, “मला गाणं लिहायला सांगितलं, पण मी नकार दिला. कारण मला वाटतं की, ही एक प्रकारची बौद्धिक आणि सर्जनशील दिवाळखोरी आहे. तुमच्याकडे जुने गाणे आहे, जे आधीच लोकप्रियसुद्धा आहे. मग तुम्ही त्यात नवीन शब्द अॅड करून ते पुन्हा का करू इच्छिता? एकतर नवीन गाणी तयार करा किंवा मान्य करा की, तुम्हाला ते काम आता परत करता येणार नाहीय. त्यामुळे जे काही झालंय ते तसंच राहू द्या. त्याला पुन्हा तयार करण्याची गरज काय?”
जावेद अख्तर यांनी १९६४ मधील ‘हकीकत’चे उदाहरण देत म्हटलं, “त्या चित्रपटातील गाणी सामान्य नव्हती. मग ती ‘कर चले हम फिदा’ असो किंवा ‘मैं ये सोचकर उसके दर से उठा था’ असो… ती अत्यंत उत्कृष्ट गाणी होती. पण, आम्ही ती वापरली नाहीत. आम्ही नवीन गाणी लिहिली आणि ती गाणी प्रेक्षकांनासुद्धा खूप आवडली. तुम्ही पुन्हा चित्रपट बनवत आहात, तर मग नवीन गाणी तयार करा. आधीच्या गाण्यांच्या यशावर अवलंबून का राहायचं? यावरून तुम्ही हे मान्य केले आहे की, आता तेवढे चांगले करू शकत नाहीत.” पुढे त्यांनी ‘बॉर्डर’च्या गाण्यांचा वापर प्रेक्षकांमध्ये जुन्या आठवणी जागवण्यासाठी केला जात आहे का, यावर स्पष्ट शब्दांत उत्तर देत म्हटलं, “मग तुम्ही नवीन आठवणी तयार करा.”
दरम्यान, ‘बॉर्डर २’मधील सर्वात लोकप्रिय गाणं ‘घर कब आओगे’, जे मूळ गाणं अनु मलिक यांनी संगीतबद्ध केले होते, त्यात मितून यांना अतिरिक्त संगीतकार म्हणून जोडले गेले आहे. मूळ गाणं गायलेल्या रुपकुमार राठोड आणि सोनू निगम यांनी ‘घर कब आओगे’ या रीमेकमध्येही आपला आवाज दिला आहे, तर अरिजीत सिंग, विशाल मिश्रा आणि दिलजीत दोसांझ यांनीही हे गाणं गायलं आहे.
