Honey Irani on Divorce With Javed Akhtar : लेखक जावेद अख्तर यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी लेखिका आणि अभिनेत्री हनी इराणी यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. जावेद अख्तर यांची दारू पिण्याची सवय आणि दोघांमधील मतभेद यामुळे अखेर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच एका मुलाखतीत हनी इराणी यांनी जावेद अख्तर यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल, पहिली भेट कशी झाली आणि त्यांचं लग्न केवळ १३ वर्षंच का टिकू शकलं नाही, यावर प्रतिक्रिया दिली.

हनी इराणी यांनी विकी ललवानी यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “माझी आणि जावेदची पहिली भेट ‘सीता और गीता’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली. मला सर्वात आधी त्याचा विनोदी स्वभाव आवडला. तो कुठल्याही विषयावर कोणाशीही सहज संवाद साधू शकायचा. त्याच्याकडे भरपूर ज्ञान होतं.” हनी यांनी रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सीता और गीता’ या चित्रपटात छोट्या भूमिकेत काम केलं होतं. हा चित्रपट जावेद अख्तर आणि सलीम खान यांनी लिहिला होता.

पत्ते खेळाताना जावेद अख्तर यांनी केलेलं प्रपोज

लग्नासाठी प्रपोज कसं केलं, याबद्दल सांगताना हनी म्हणाल्या, “आम्हा दोघांमध्ये एकमेकांविषयी ओढ होती आणि शूटिंगशिवायही आम्ही भेटायचो. एकदा जावेद पत्ते खेळत होता आणि तो हरत होता. त्याने मला एक पत्ता काढायला सांगितला. मी काढलेला पत्ता त्याच्यासाठी लकी ठरला आणि तो जिंकला. तेव्हा तो म्हणाला, ‘तू माझ्यासाठी खूप लकी आहेस, चल आपण लग्न करूया.’ अशा साध्या पद्धतीने त्याने मला प्रपोज केलं. ६ ते ७ महिन्यांच्या ओळखीनंतर आमचं लग्न झालं.”

यशामुळे जावेद बदलले; दारू अडचण ठरली

लग्न का टिकू शकलं नाही, याबद्दल बोलताना हनी म्हणाल्या, “मला आजही नक्की सांगता येत नाही की ते नातं का टिकू शकलं नाही. सगळं खूप वेगाने घडत होतं. जावेदला अगदी झपाट्याने यश मिळत होतं आणि यशामुळे माणूस बदलतो. तसंच त्याचं आयुष्य आणि आजूबाजूचं वातावरणही बदलतं. कदाचित मी त्या बदलांशी जुळवून घेऊ शकले नाही. त्यात त्याची दारू पिण्याची सवय लागली होती. तो अधिक लोकांना भेटू लागला, त्यामुळे त्याचं संध्याकाळी बाहेर राहण्याचं प्रमाणदेखील वाढलं. शेवटी आम्हा दोघांनाही जाणवलं की, हे नातं पुढे टिकणार नाही. त्याने अनेकदा दारू सोडण्याचाही प्रयत्न केला.”

पुढे त्या म्हणाल्या, “भांडणं करत बसण्यापेक्षा आणि एकमेकांना त्रास देण्यापेक्षा वेगळं होणंच योग्य वाटलं. हा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतला. मीसुद्धा तेव्हा खूप लहान होते, त्यामुळे सगळा दोष मी जावेदला देत नाही. आम्ही खूप लवकर लग्न केलं. कदाचित थोडा वेळ थांबलो असतो, तर लग्नच झालं नसतं.”

घटस्फोटानंतरही एक्स जोडीदाराशी मैत्री कशी ठेवता येते, असा प्रश्न विचारल्यावर हनी म्हणाल्या, “एकदा वेगळं झाल्यावर राग किंवा दु:ख बाळगण्याचं कारण काय? मग रडायचंच कशासाठी?”

शबाना आझमींबरोबरच्या मैत्रीला वेळ लागला

हनी यांनी हेही मान्य केलं की, जावेदशी वेगळं झाल्यानंतर ३ ते ४ वर्षांत त्यांच्यातील नातं सुधारलं. “तो माझ्यासाठी आणि मुलांसाठी आधार होता. मात्र शबाना आझमींबाबत मला थोडा वेळ लागला. आम्हा दोघींनीही आमच्यातल्या मैत्रीसाठी प्रयत्न केले आणि आज आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत. आम्ही एकमेकांच्या वाढदिवसाला जातो आणि एकत्र प्रवासही करतो,” असं हनी इराणी यांनी सांगितलं.