Salim Khan Health Update : बॉलीवूडचे ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना १७ फेब्रुवारी रोजी अचानक मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ब्रेन हॅमरेजचा त्रास झाल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सलीम खान यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले गेल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. अशातच आता त्यांचे सहकारी आणि प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी सलीम यांच्या प्रकृतीबाबतची अपडेट दिली आहे. सलीम यांच्या प्रकृतीबद्दल जावेद अख्तर नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊया
सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल जावेद अख्तर म्हणाले…
सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दलची बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. अनेक कलाकारांनीसुद्धा रुग्णालयात जात त्यांची भेट घेतली होती. जावेद अख्तरसुद्धा त्यांना भेटायला गेले होते. अशातच आता जावेद अख्तर यांनी सलीम खान यांची हेल्थ अपडेट देत सांगितलंय की, त्यांच्या प्रकृतीत आधीपेक्षा खूप सुधारणा आहे आणि ते हळूहळू बरे होत आहेत.
दिल्लीमध्ये गुरुवारी झालेल्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात जावेद अख्तर सलीम खान यांच्याविषयी म्हणाले, “सलीम आता बरे आहेत. ते हळूहळू रिकव्हर होत आहेत. ते खुर्चीवर बसून बोलत आहेत, म्हणजे त्यांच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली आहे.”
सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल आमिर खान म्हणालेला…
सलीम यांच्या प्रकृतीबाबत आमिर खाननंदेखील प्रतिक्रिया दिली होती. “मी सलीम खान यांना भेटायला गेलो होतो. पण मला त्यांना प्रत्यक्ष भेटता आलं नाही. अलवीरा यांनी सांगितले की त्यांची प्रकृते आता हळूहळू सुधारत आहे.” तर अभिनेत्री डेझी शाहनंसुद्धा त्यांच्या प्रकृतीबाबत सांगितले की ते आता आधीपेक्षा बरे आहेत. “मला सलीम सरांना रुग्णालयात भेटता आले नाही, पण मी सतत सलमान आणि त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. सलीम सर आता बरे आहेत. त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत आणि आता धोका टळला आहे” असं ती म्हणाली होती.
दरम्यान, १७फेब्रुवारी रोजी सलीम खान यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर DSA (Digital Subtraction Angiography ची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. सध्या ते रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
सलीम खान आणि जावेद अख्तर ही जोडी बॉलीवूडची प्रसिद्ध जोडी आहे. सलीम खान यांनी जावेद अख्तर यांच्याबरोबर अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांपैकी ‘शोले’ हा चित्रपट आहे. याशिवाय, त्यांनी ‘दीवार’, जंजीर’, ‘डॉन’, ‘मिस्टर इंडिया’, ‘हाथी मेरे साथी’, ‘सीता और गीता’, ‘यादों की बारात’सारख्या चित्रपटांचं त्यांनी लेखन केलं आहे.
