‘शोले’, ‘मशाल’, ‘जीवन एक संघर्ष’, ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘सीता और गीता’ अशा अनेक चित्रपटांच्या कथा जावेद अख्तर यांनी लिहिल्या. जावेद अख्तर व सलीम खान ही लेखक जोडी प्रचंड गाजली. बॉलीवूडला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे म्हटले जाते.

जावेद अख्तर पटकथा लेखक व गीतकार म्हणून लोकप्रिय होते. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ते चर्चेत आले होते. जावेद अख्तर यांच्या दारूच्या व्यसनाबद्दल अनेकदा बोलले जाते. त्यांची पहिली पत्नी हनी इरानी तसेच दुसरी शबाना आझमी, इतकेच नाही तर स्वत: जावेद अख्तर त्यांच्या व्यसनाबद्दल अनेकदा बोलले आहेत.

“मला व्हिस्कीची ॲलर्जी झाली होती, त्यानंतर मी…”

‘मिड डे’ला दिलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी व्हिस्की पिण्याचे बंद का केले आणि त्याऐवजी बीअर प्यायला सुरुवात केली याबद्दल सांगितले होते. जावेद अख्तर म्हणालेले, “मला व्हिस्कीची अ‍ॅलर्जी झाली होती, त्यानंतर मी विचार केला की मी फक्त बीअर प्यायली पाहिजे. एकदा प्यायला बसल्यानंतर मी १८ बॉटल बीअर पित असे; त्यानंतर मी विचार केला की मी बीअर पिऊन माझ्या पोटाची चरबी वाढवत आहे. मग मी बीअर पिणे सोडले, त्यानंतर मी रम पिऊ लागलो.”

Award Banner

याच मुलाखतीत ते असेही म्हणालेले, “दारू पिताना कोणी माझ्या बरोबर असावे याची मला गरज वाटत नसे. कोणी बरोबर असेल तर ठीकच आहे, पण कोणी नसेल तर मी एकटाच दारू घेईन.”

“तो माझा बेजबाबदारपणा…”

सपन वर्मा यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी कबूल केले होते की, दारूच्या व्यसनामुळे त्यांचे पहिले लग्न टिकू शकले नाही. ते म्हणालेले, “माझे पहिले लग्न टिकले नाही, याचा मला पश्चात्ताप आहे. ते टिकू शकले असते, पण तो माझा बेजबाबदारपणा होता, माझ्या दारू पिण्याच्या सवयीमुळे ते लग्न टिकलं नाही.”

ते असेही म्हणालेले, “तुम्ही जेव्हा दारूच्या नशेत असता, तेव्हा उताविळपणे निर्णय घेता. छोट्या छोट्या गोष्टींवरून तुम्ही भांडणे करता; या सगळ्या चुका माझ्याकडून झाल्या आहेत.”

दारू सोडण्याबद्दल जावेद अख्तर म्हणालेले, “माझ्या आयुष्यात मी काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत, त्यामध्ये दारू सोडल्याचादेखील समावेश आहे. ३१ जुलै १९९१ ला मी शेवटची दारू प्यायलो होतो, त्यानंतर मी शँपेनचा एक घोटही प्यायलो नाही. इतकेच काय तर कोणतेही यश साजरे करतानाही मी कधीच दारू प्यायलो नाही.”

जावेद अख्तर यांच्या पत्नी शबाना आझमी यांनीदेखील जावेद अख्तर यांच्या दारूच्या व्यसनाबद्दल वक्तव्य केले. त्या म्हणालेल्या, “जेव्हा जावेद अख्तर दारू प्यायचे, तो काळ कठीण होता. त्यांनी ठरवलं होतं की जर त्यांनी असंच दारू पिणं सोडलं नाही, तर ते जास्त काळ जगू शकणार नाहीत आणि सर्जनशील कामही करू शकणार नाहीत.”